Your Own Digital Platform

उदयनराजेंच्या विरोधात पंजाबराव पाटलांनी शड्डू ठोकलाकऱ्हाड : शेतकऱ्यांकडुन 'एक नोट, एक व्होट' घेऊन येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बळीराजा शेतकरी संघटना सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर, हातकणंगले, उस्मानाबाद आणि माढा या सात जागा लढविणार आहे. तसेच साताऱ्यातून उदयनराजेंच्या विरोधात स्वत: लढणार असल्याची घोषणा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी आज केली.

देशाला स्वातंत्र्य मिळुन ७० वर्षे झाली मात्र देशातला शेतकरी आजही गुलामगिरीत जगत आहे असे सांगून पाटील म्हणाले, ''अनेक सरकारे आली आणि गेली. परंतु, शेतकऱ्यांचे जीवनमान बदललेच नाही. शेतकऱ्यांनी रात्रंदिवस घाम गाळुन पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. तोच शेतमाल खरेदी करणाऱ्या ग्राहकाला परवडत नाही. याला शेतमाल खरेदी विक्रीतील दलाली कारणीभुत आहे. त्यातुन दलाल मालामाल आणि शेतकरी कंगाल अशीच स्थिती झाली आहे. त्याला सरकारचे धोरणच कारणीभुत आहे. सरकारी धोरण आज सरकारचे मरण झाले आहे. त्यासाठी शेतकरी विरोधी कायदे रद्द केले पाहिजेत. जीवनावश्‍यक कायद्यातुन शेतमाल वगळला पाहिजे. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत दर मिळाले पाहिजे आणि शेतकरी हिताचे नवीन कायदे बनवले पाहिजेत."

ते पुढे म्हणाले, "शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावे यासाठी बळीराजा शेतकरी संघटना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी सातारमधुन मी स्वतः, हातकणंगलेमधुन बी.जी.पाटील, सांगलीतुन डॉ. उन्मेष देशमुख, उस्मानाबादमधुन भिमाशंकर बिराजदार, माढ्यातुन संजय पाटील -घाटणेकर, लातुरमधुन वैजनाथ पाटील यांच्यासह कोल्हापुरचीही जागा लढवण्यात येईल. त्याला शेतकरी, शेतमजुर, सामान्य जनता, बळीराजा संघटनेला चांगला पाठिंबा देईल. यावेळी बी. जी. पाटील, डॉ. देशमुख, श्री. बिराजदार, संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला आदि उपस्थित होते.