कवी गिरीश आणि मुधोजी हायस्कूल
कविवर्य गिरीश त्यापैकी एक अशा थोर कवी व शिक्षणतज्ञ म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध अशा व्यक्तिमत्वाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव रहिमतपूरवासिय दि. 9 व 10 फेब्रुवारी या काळात मोठ्या प्रमाणात साजरा करताहेत.
गुरुवर्य शं. के. कानेटकर उर्फ कवी गिरीश फलटणच्या मुधोजी हायस्कूलच्या प्राचार्यपदी असतानाच्या काही आठवणी सांगीतल्या आहेत मुधोजी हायस्कूलचे माजी विद्यार्थी आर. के. देशपांडे यांनी...

आठवणी दाटतात


माझे वडील कै. कृ. वि. देशपांडे यांचे श्रद्धास्थान प्रा. शं. के. कानेटकर आजही फलटणवासियांच्या मनामनामध्ये, हृदयामध्ये विराजमान आहेत. माझ्या वडीलांप्रमाणे काही काळ सर माझे गुरु होते. माझ्या वडीलांना त्यांनी ते मुधोजी हायस्कूलमध्ये शिक्षक असताना खूपच मोलाची मदत केली. त्यांना बी. ए. च्या परीक्षेसाठी आत्मीयतेने मार्गदर्शन केले. एवढेच नाही तरआण्णांच्या (माझे वडील) कार्यक्षमतेची जाणीव असल्यामुळे गिरीशांची श्रीमंत मालोजीराजे यांच्याकडे गोंदवले येथे संस्थेची पहिली ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा नवचैतन्य हायस्कूल 1958 साली सुरु करण्याचे ठरले. तेव्हा त्यांची मुख्याध्यापकपदी शिफारस केली. गिरीशांच्या काळात मुधोजी हायस्कूलचा प्रत्येक शिक्षक अत्यंत कार्यक्षम होता.

पुढे आण्णा जेव्हा बीएड. एम.ए. एमएड झाले. तेव्हा आवर्जुन अभिनंदन व प्रोत्साहनपूर्वक पत्रे पाठवण्यात गिरीश कधीही विसरले नाहीत. त्यांच्या प्रोत्साहनाने आण्णा जीवनाच्या सर्व क्षेत्रात मोठी झेप घेउ शकले. आदर्श शिक्षक पुरस्कार केंद्र सरकारने पहिल्यांदा सुरु केला तेव्हा त्यात गिरीशांना त्यात समाविष्ट केले. महाराष्ट्रातील केंद्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार पटकावणारे कवी गिरीश पहिले आदर्श शिक्षक होत. सरांचे आचरण, व्यासंग, शिस्त यांचा प्रभाव फलटणच्या तत्कालीन शिक्षक, विद्यार्थी यांच्यावर स्थायी स्वरुपात झाला. आजही त्यांची आठवण त्यांचे असंख्य विद्यार्थी काढतात. परवाच मकरसंक्रांत झाली. तेव्हा आम्हा विद्यार्थ्यांना तिळगुळाची आठवण झाली. सर शाळेप्रमाणे सर घरीही विद्यार्थ्यांना तिळगुळ देत. प्रत्येकाची जातीने विचारपूस करत. शाळा सुरु होण्यपुर्वी प्राचार्य गिरीश पोर्चमध्ये नुसते उभे राहिले तरी त्यांना पाहून सर्व विद्यार्थी शिस्तीत वर्गात जात वर्गाबाहेर मार्गिकेतून जाताना सरांच्या बुटांचा आवाज ऐकला तर वर्गातील गोंगाट एकदम शांत व्हायचा. शिस्तीचे दुसरे नाव म्हणजे शं. के. कानेटकर.

त्यांच्या कारकिर्दीत दुबार शाळा नव्हती. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे त्यांचे एकमेव ध्येय होते. व्यायाम, खेळ या गोष्टींवर त्यांचा भर असे. सर स्वत: जोर, बैठका नियमितपणे काढत. शरीरयष्टी त्यांनी कमावली होती. विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही या गोष्टी सांभाळण्याबाबत सर आग्रही असत. स्वत: कवी तर होतेच पण त्या काळात सर्वश्रुत रविकिरण मंडळाचे सदस्य होते. आम्ही विद्यार्थी आम्हाला भाग्यवान मानतो. कारण सरांनी कवी यशवंत, माधव ज्युलियन, मायदेव अशा प्रसिद्ध कवींच्या काव्यगायनाचा लाभ तत्कालीन मुधोजी वासियांना करुन दिला. मधल्या हॉलमध्ये झालेल्या सभा आजही आमच्या स्मरणात आहेत. श्रीमंत मालोजीराजे यांच्या संपर्कातील अगणित थोर व्यक्ती शाळेत येत.

एकदा संत तुकडोजी महाराज शाळेत अचानक आले. तेव्हा त्यांच्यासाठी काय कार्यक्रम घ्यायचा असा श्रीमंत राजेसाहेबांना प्रश्‍न पडला. ‘साध्याही विषयात आशय कधी मोठा आढळे’ केशवसुतांच्या काव्यपंक्तीची याप्रसंगी आठवण होते. तुकाराम नाळे हा त्यावेळचा शिपाई. नुकतीच नविन घंटा शाळेत आणली होती. सरांना त्याची आठवण झाली अन त्यांची कल्पना श्रीमंतांच्या कानावर घातली.

संत तुकडोजी महाराजांच्या हस्ते या घंटेचे उद्घाटन (?) झाले. तुकडोजी महाराज म्हणाले आज ही घंटा मी वाजवतो. पण एक अट आहे. यापुढे सर्वांनी शाळेत दररोज वेळेत यावे. आहे कबूल? आम्ही विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात होकार दिला. तेव्हा तुकडोजी महाराजांनी घंटेचा गजर केला. फलटणचे सांस्कृतिक वैभव श्रीमंत मालोजीराजे यांच्यामुळे ज्यांनी वाढवले त्यात कवी गिरीशांचा सिंहाचा वाटा होता. तत्कालीन ख्यातकिर्त साहित्यिकांची मांदियाळी गिरीशांच्या प्रयत्नामुळे शाळेस लाभली. विद्यार्थ्यांची सांस्कृतिक उंची त्या काळात वृद्धिंगत झाली. दीर्घकाळापर्यंत जनमानसावर ठसा राहणार्‍या व्यक्ती विरळतेने आढळतात. कविवर्य गिरीश त्यापैकी एक अशा थोर कवी व शिक्षणतज्ञ म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध अशा व्यक्तिमत्वाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव रहिमतपूरवासिय दि. 9 व 10 फेब्रुवारी या काळात मोठ्या प्रमाणात साजरा करताहेत.

No comments

Powered by Blogger.