गदिमा, पु. ल. आणि सुधीर फडके यांनी सांस्कृतिक जाणिवा समृद्ध केल्या: अरुणा ढेरे
सातारा: गदिमा, पुल आणि सुधीर फडके (बाबूजी) यांनी केवळ काळ गाजवला इतकेच नव्हे तर काळ घडविला. त्यांनी रसिक व सामान्यजणांच्या सांस्कृतिक जाणिवा समृद्ध केल्या. चित्रपट, संस्कृती, साहित्य, काव्य यांना समृद्ध करणारे आणि मराठी परंपरेला शब्द आणि सूर यांना समान सूर देणारे हे त्रयी होते, असे प्रतिपादन अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.अरुणा ढेरे यांनी केले.

शासनाचा मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोश मंडळ आयोजित पुल देशपांडे, ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी निमित्त येथे आयोजित त्रिवेणी साहित्य संमेलन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. वाईच्या नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे, भाषा विभागाच्या सहसचिव अपर्णा गावडे, वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सी. व्ही. काळे, शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखाप्रमुख प्राची देशमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात मराठी विश्‍वकोश सूची खंड प्रकाशन, ज्ञानमंडल संकेतस्थळ आणि कुमार विश्‍वकोश (जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग 3) लोकार्पण करण्यात आले.

दिर्घ व संपन्न वारसा असलेले वाई हे गाव आहे. आणि महाराष्ट्राची संस्कृती, कृष्णा, गोदावरी व भिमा या नद्यांच्या काठावर जोपासली आहे. पूर्वी श्रीधर व्यं. केतकर यांच्यासह अनेक विद्वानांनी एकत्र येवून ज्ञानकोशाची निर्मिती केली असल्याचे ढेरे यांनी यावेळी नमुद केले. मराठीतील संपन्न ज्ञान परंपरा लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी या सर्वांना मोठी पायपीट करावी लागली. अशा ज्ञानोपासक निर्रअहंकारी माणसांनी पुढे आणलेली कोश परंपरा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापासून दिलीप करंबेळकर यांच्यापर्यंतच्या सर्व अध्यक्षांनी पुढे नेली. नव्या काळाला अनुरूप काम ही मंडळी करीत आहेत. संगणकावर एका बाजुला ज्ञान व दुसर्‍या बाजूला मनोरंजन एका क्लिकवर उपलब्ध होत आहे, त्यामुळे जड खंड घरात ठेवण्याची अडचण दूर झाल्याचे डॉ. ढेरे म्हणाल्या. ग्रंथ, वर्तमानपत्रे मासिके यांचे महत्व वेगळे आहेच. पण त्यांच्या पलिकडे जावून शास्त्रिय माहिती देण्याचे काम ज्ञानकोश करीत आहेत. कुमार विश्‍वकोषा सारखे वेगवेगळया समाजघटकांना उपयुक्त ठरणारे कोष उपलब्ध केले जात आहेत. त्यातल्या नोंदी अद्ययावत करणे अवघड असते. हे अवघड काम करणार्‍या मंडळींबद्दल आभाराची भावना मनात ठेवूया.

जाणीवेची प्रगल्भता वाढविणारे हे त्रयी होते. काळावर मुद्रा उमटवून गेलेली ही माणसे आहेत त्यामुळे त्यांच्या साहित्य कृतींचा मराठी माणसाच्या मनावर व आयुष्यावर परिणाम होत राहील असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुल सारख्यांनी सर्व सामान्य रसीकांच्या सांस्कृतीक जाणीवा घडविल्या. त्यामुळे पुल फक्त त्यांच्याच काळात नव्हे तर सर्वकाळ अष्टपैलू राहिले. फक्त विनोदच नाही तर आनंद वाटत फिरणे, गुणीजनांना उचलून धरणे हे काम त्यांनी केले. लगेच अरे तूरेवर येणार्‍या मराठी माणसाला पुलंनी हसायला शिकविले. दुसर्‍यांच्या फजितीत होणारा आनंद हा अर्निविश असला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. ते रत्नपारखी समाजहितैशी उदार आणि त्यांचे माणूसपण मोठे होते. ज्या मर्ढेकरांच्या कवितांवर त्या काळात खटले भरले गेले त्या कवितांचे वाचन करून समाजमनाची अभिरूची त्यांनी घडविली. तर्कतीर्थांनीही पुलंबद्दल लिहिताना पुलंनी नैतीक मुल्यांबद्दलची ओढ व त्यांचा मुल्य गर्भ विनोद यांचा गौरव केला असल्याचे नमूद केले.

साहित्यिकांचेही अधिराज्य असते. सत्ता निरपेक्ष सामर्थ्य यांच्यामध्ये असते हे या त्रयींनी दाखवून दिले. गदिमांनी सारे मराठी रसिक जेवले तरीही भरलेली थाळी कधीच संपणार नाही अशी मेजवानी दिली. उत्तम गिते, पटकथा हा त्यांनी दिलेला न विसरता येणारा ठेवा आहे. मराठी भावगितांची परंपरा, गदीमा व बाबुजींनी चित्रपट गितांशी जोडून दिली. पाऊनशे वर्षापूर्वीच्या महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचे चित्रण त्यांच्या गितांमूधन दिसते. भलेपणा, माणुसकी, एकमेकांना धरून रहाणे व माणुसकही टिकविण्याचा उद्गार त्यांनी दिला. लोकांच्या ओठावरची भावना त्यांनी गितसंगीतात आणली. त्यांनी शिरी धरलेल्या मूल्यांची जपणूक केली. त्यांची साहित्य निर्मिती मराठी मातीचा गंध, मराठी संस्कृतीचे प्राणतत्व आहे. नागर संस्कृतीतील मध्यमवर्गाला बाबूजींनी भावगीताच्या रुपाने नवा स्वर दिला. त्यांनी भाषेचे उच्चारीत रूप गाण्यांमधून सांभाळले, हे कर्तव्य मानले. भाषेचा धगधगीतपणा व लडीवाळपणा संगीतात आणला.

नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना संयोजकांनी वाईची निवड करून वाईला मान दिला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून नव्या पिढीने सांस्कृतीक वारसा जपला पाहिजे अशी भावना व्यक्त केली.

प्रास्ताविकात विश्‍वकोश मंडळाचे अध्यक्ष दिलीप कळंबेकर यांनी राज्यभरात 47 ज्ञानमंडळे स्थापन केल्याचे सांगितले. आपापल्या काळातील भावविश्‍व नव्या पिढीसमोर ठेवणार्‍या या त्रयींच्या वाटा वेगळया होत्या. पण माणसांच्या भावविश्‍वाचा वसा त्यांनी पुढच्या पिढीपुढे ठेवला. म्हणून ते शब्द आणि स्वरांचे युगनिर्माते आहेत, असे त्यांनी नमूद केले.

लेखिका विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. सचिव शामकांत देवरे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास राहुल सोलापूरकर, फैय्याज शेख, विनया बापट, डॉ. शरद अभ्यंकर, डॉ. सुधीर बोधे, अरुण देव, राजेंद्र चावलानी, बाबुराव शिंदे, श्रीमंत होनराव, गटशिक्षणाधिकारी कमलाकर म्हेत्रे, डॉ. मधुसूदन मुजुमदार आदी व साहित्यरसिक, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.