हिंदकेसरीने यूपी केसरीला दाखवले अस्मान : विकास जाधव विजयी

औंध : येथील श्री यमाई देवीच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेल्या कुस्तीमैदानात भोसरे येथील हिंदकेसरी विकास जाधव याने यूपी केसरी पवन दलाल याला धोबीपछाड डावावर पराभवाची धूळ चारली. विकास जाधवच्या विजयानंतर मैदानात कुस्तीशौकिनांनी एकच जल्लोष केला.

खटाव तालुक्यातील औंध येथील श्री यमाईदेवी यात्रेनिमित्त देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन करण्यात आले. देवस्थान ट्रस्टच्या मुख्य विश्‍वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते हिंदकेसरी विकास जाधव आणि यूपी केसरी पवन दलाल यांची कुस्ती लावण्यात आली.

प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत सलामीला आक्रमक पवित्रा घेतलेल्या विकास जाधवचे हल्ले पवनने धुडकावून लावले. पवनच्या एकेरी पटाच्या डावावर विकासने बचाव करून त्याला धोबीपछाड डावावर चितपट करून मैदान मारले. विकासने कुस्ती जिंकताच जल्लोष केला. त्याला गायत्रीदेवींच्या हस्ते दीड लाख रुपये इनामासह श्रीयमाई केसरी किताबाची गदा देऊन गौरविण्यात आले. यावेळी चारुशीलाराजे पवार, हिंदकेसरी संतोष वेताळ, शिवाजीराव सर्वगोड, धनाजी फडतरे, दिलीप पवार, रमेशबापू जगदाळे, वसंत माने, सदाशिव पवार, हणमंतराव शिंद, सुनील मोहिते, सचिन शेलार, चंद्र्रकांत पाटील, धनाजी पावशे, जालिंदर राऊत आदी उपस्थित होते.

द्वितीय क्रमांकाच्या लढतीत शाहूपुरीच्या संतोष दोरवड पुढे आक्रमक लढणार्‍या पुण्याच्या भारत मदनेची डाळ शिजली नाही. भारतने दुहेरी पटाची पकड केली; परंतु काऊंटर अ‍ॅटॅक करीत संतोषने समोरून लपेट लावीत भारतला पराभूत केले. प्रशांत शिंदे आणि बाळू तनपुरे, संदीप बोराटे विरुद्ध शरद पवार ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. मैदानात मनोज बिटले, विश्‍वजित आणले, सुहेल शेख, सनी इंगळे, किसन तनपुरे, प्रवीण शेरकर, संग्राम सूर्यवंशी, अक्षय थोरात, रणजित राजमाने, बाबू सर्वगोड, आकाश वेताळ, आर्यन भोंगे, नितीन पाटील, भारत पवार, गोरख हजारे, ऋत्वीक क्षीरसागर, तुषार निकम, वैष्णवी खैरमोडे, श्रुती येवले यांनी कुस्तीशौकिनांची मने जिंकली.

औंध येथील कुस्ती मैदानात हिंदकेसरी विकास जाधव याला मानाची गदा व इनाम देताना गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, हणमंतराव शिंदे, प्रशांत खैरमोडे आदी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.