Your Own Digital Platform

विरोधकांच्या खच्चीकरणाचे राजकारण

भारतीय जनता पक्षाला सध्या निवडणूक प्रचाराने एवढे ग्रासले आहे की आपल्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कोणताही नेता असू नये यासाठी विरोधकांच्या खच्चीकरणाचे राजकारण त्यांनी सुरू केले आहे.

प्रचारातील ही आक्रमकता इतकी टोकाला पोहोचली आहे की, दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचे आव्हान दिले आहे. त्याचप्रमाणे शरद पवार ज्या लोकसभा मतदारसंघात उभे राहतील त्या मतदारसंघात पवारांचा पराभव करण्याचेही त्यांनी आवाहन कार्यकर्त्यांना केलेले आहे.

पडत्या फळाची आज्ञा मानत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लगेच त्याचीच री ओढली आणि महाराष्ट्रात मागच्या वेळी आपण 42 जागा जिंकल्या होत्या यावेळी 43 जागा जिंकू असा निर्धार करतानाच 43 वी जागा ही बारामतीची असेल असे भाकीत केले.

वास्तविक हा मतदारसंघ शरद पवारांचा मतदारसंघ आहे. गेल्या दोन टर्म या मतदारसंघातून शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

त्यामुळे पवार निष्ठांची मांदियाळी असलेल्या या मतदारसंघात भाजपने विजयाचे स्वप्न पाहणे ही थोडी अतिशयोक्तीच झाली असेच म्हणावे लागेल. या मतदारसंघातून शरद पवारांनी पराभव हा कधीच पाहिलेला नाही. किंबहुना आपल्या 55 वर्षाच्या कारकिर्दीत जेवढया म्हणून निवडणुका शरद पवारांनी लढवल्या त्यामध्ये त्यांना अपयश हे कधीच आलेले नाही. राजकीय स्थित्यंतरे काहीही झाली, सत्तेची उलथापालथ झाली तरी शरद पवार यांनी आपला गड कायमच राखलेला आहे. कधी विधानसभेत, तर कधी लोकसभेत पण बारामतीवर आपली हुकूमत पवारांनी कायम राखलेली आहे. 1977 च्या आणीबाणीनंतरच्या काळातील सत्तांतर असो अथवा मोदी लाट, वाजपेयी लाट अशा कसल्याही लाटा आल्या तरी पवार मात्र जिथे आहेत तिथेच आहेत. त्यांनी आपला पराभव कधीच होऊ दिला नाही. किंबहुना शरद पवार जेव्हा आमदार होते आणि राज्याचे नेतृत्व करत होते तेव्हाही या मतदारसंघातून त्यांनी अजित पवारांना प्रथमच लोकसभेत निवडून पाठवले होते. अजित पवार फार काळ तिथे रमले नाहीत आणि पवारांना दिल्ली जावे लागल्यामुळे त्यांनी कॅसलिंग करून अजित पवारांना आमदारकीला बोलावून आपण त्याच मतदारसंघातून पुन्हा पोटनिवडणुकीत निवडून गेले होते. शरद पवारांनी आपली कन्या सुप्रिया सुळे यांना राजकारणात आणण्यासाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून हाच मतदारसंघ दिला आणि स्वत: माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

त्यामुळे शरद पवार यांचा भक्कम गड असलेला हा मतदारसंघ काबीज करणे तितकेसे सोपे नाही, तर अशक्यच आहे. तरीही भाजपच्या या निर्धाराला दाद द्यावी लागेल. म्हणजे एकीकडे सगळे ओपिनियन पोल, विविध सव्र्हे आणि पाहण्यांचे अंदाज मोदींच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या लोकप्रियतेत घट झाल्याचे म्हटले आहे. मतांची टक्केवारी कमी झाल्याचे सांगून मागच्यासारखे बहुमत मिळणार नाही आाणि भाजपला संख्याबळही प्राप्त होणार नाही, असे अंदाज वर्तवले आहेत. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून 48 जागा लढवण्यासाठी 48 उमेदवारही मिळवता येणे शक्य नाही, अशी परिस्थिती आहे. शिवसेनेबरोबर जागा वाटप झाले, तर 24-24 जागा लढण्याची तयारी दाखवली आहे. यातीलच काही जागा आणखी मित्र पक्षांना द्याव्या लागणार आहेत. अशा परिस्थितीत भाजपच्या किंवा एनडीएच्या महाराष्ट्रातून 43 ते 45 जागा जिंकण्याचा संकल्प म्हणजे फार मोठे स्वप्न आहे. त्यातही शरद पवारांचा मतदारसंघ खेचून आणण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे फार मोठी झेप आहे असेच म्हणावे लागेल. शरद पवारांनी पुणे जिल्ह्यावर प्राबल्य मिळवण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले. पुणे लोकसभा मतदारसंघावर आपले वर्चस्व मिळवण्याचा चंग बांधला होता; परंतु ते त्यांना फारसे जमले नाही म्हणून त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ आणि त्या अंतर्गत येणा-या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपले वर्चस्व मिळवले आणि बारामती मजबूत केली.

बारामतीचा विकास, तिथल्या रस्ते-पाणी यांच्या विकासकामांची तुलनाच होऊ शकत नाही. तिथले नाटयगृह असेल, बाजारपेठा असतील सर्व काही विकसित आणि योजनाबद्ध करून एका यशस्वी नेत्याचा मतदारसंघ कसा असला पाहिजे याचे उदाहरण त्यांनी घालून दिले. म्हणजे आपल्याकडे मोठे नेते असतात पण दिव्याखाली अंधार म्हणतात तसा त्यांच्याच मतदारसंघात अंधार असतो. गांधी घराण्याचा आणि पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि त्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे अमेठी आणि रायबरेली मतदारसंघ किती अविकसित आणि मागास आहेत. देशातील सर्वोच्च पदे भोगणा-या नेत्यांना आपल्या मतदारसंघाचा विकास साधता येत नाही आणि देशाच्या विकासाच्या गप्पा केल्या जातात. पण शरद पवारांनी तसे होऊ दिले नाही. त्यांनी आपल्या मतदारसंघाचे सोने केलेले आहे. जगातली कोणतीही गोष्ट बारामतीत नाही असे नाही. याची जाणीव तिथल्या नागरिकांना आहे.

आपला राजा हा शरद पवार आहे आणि देशात तिकडे काहीही होवो पण हा राजा आपल्याला सुखात ठेवील असा विश्वास तिथल्या जनतेला आहे. त्यामुळे पवारांचे पारडे तिथेच जडच नसून ते भक्कम आणि अभेद्य असे आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्याशिवाय तिथे दुसरा कोणीही उमेदवार सहनच होऊ शकत नाही. भारतीय जनता पक्ष सातत्याने या मतदारसंघात घुसण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यात अद्याप भाजपला यश आलेले नाही. असे असतानाही या मतदारसंघातून पवारांच्या पराभवाचे स्वप्न पाहणे म्हणजे अशक्य ते शक्य करून दाखण्याचा प्रयत्न आहे. अर्थात पवारांनी ज्याप्रमाणे पुण्यातील जयंतराव टिळक, विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी यांना वेळोवेळी पराभवाचा दणका दिला आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील बॅ. अंतुलेंपासून, वसंत साठे अशा मातब्बरांनाही पाडण्याचे काम केले तसा काही करिष्मा भाजप करणार असेल, तर या मतदारसंघावर भाजप कब्जा मिळवू शकतो; परंतु हे फार मोठे स्वप्न आहे. या स्वप्नगर्भाचा अंत वेळीच करण्याचा प्रयत्न ते करणार यात शंकाच नाही.