Your Own Digital Platform

सरकार चौथ्या स्तंभाच्या मजबुतीसाठी ठामपणे पाठीशी

मुंबई : विृत्तपत्र हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. तो मजबूत करण्यासाठी राज्य सरकार त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.

राज्य सरकारने वृत्तपत्रांसाठी नवीन जाहिरात धोरण जाहीर केल्याबद्दल विदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशन व महाराष्ट्र दैनिक वृत्तपत्र संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा कृतज्ञता समारंभ शुक्रवारी ‘सह्याद्री’ अतिथीगृहात आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र दैनिक वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष ‘पुढारी’चे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, लोकमत मीडियाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विदर्भ डेली न्यूजपेपर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण चांडक, इल्नाचे उपाध्यक्ष प्रकाश पोहरे, इंडियन एक्स्प्रेसचे चेअरमन विवेक गोयंका, टाइम्स ऑफ इंडियाचे शिवकुमार सुंदरम, गुजरात समाचारचे चेअरमन बाहुबली शहा, यांच्यासह विविध वृत्तपत्रांचे मालक, संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मुख्यमंत्री म्हणाले, इलेक्ट्रॉनिक माध्यम असोत की आजची समाजमाध्यमे, ही माध्यमे समाजाला माहिती देण्याचे काम करतात. मात्र, समाजमन घडविण्याची आणि समाजपरिर्वनाची शक्ती ही केवळ वृत्तपत्रांमध्येच आहे. चारशे वर्षांचा इतिहास असूनही आजही सर्वाधिक विश्वासार्ह माध्यम हे वर्तमानपत्रच आहे. वृत्तपत्रांसमोर आज अस्तित्वाचे संकट उभे असून, शाश्वत मूल्य असलेले हे माध्यम जगले पाहिजे, यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच जाहिरातींच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी जाहिराती या शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे एक साधन असते, त्याकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहता येणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

25 फेब्रुवारीला सुरू होणार्या विधिमंडळाच्या अधिवेशनात लेखानुदान मांडण्यात येणार असून, जसे जाहिरात दर वाढविले, तशीच जाहिरातींसाठीची भरीव आर्थिक तरतूद लेखानुदानाच्या माध्यमातून केली जाईल. जाहिरात देताना जाहिरातीचा आकारही कमी केला जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

यावेळी बोलताना डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. विरोधी पक्षाचे काम असणार्या वृत्तपत्रांच्या संघटनेकडून एका राज्यकर्त्याचा सत्कार होणे ही दुर्मीळ गोष्ट असून, आज फडणवीस यांच्या कामामुळे ती पहिल्यांदाच घडत आहे. गुळगुळीत कागदावर बुळबुळीत मजकूर देणे म्हणजे पत्रकारिता नव्हे, या लोकमान्य टिळकांच्या वचनानुसार आम्ही ते व्रत जपून पत्रकारिता करीत आलो आहोत. साहित्यिकांपेक्षाही पत्रकार दोन पावले पुढे असतो. तो पत्रकार आज मुख्यमंत्र्यांचा सत्कार करीत आहे, ही घटना साधी नाही. वृत्तपत्र चालविणे अवघड आणि तारेवरची कसरत होत असताना, लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला आधार देणारा धाडसी निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. त्यामुळे केवळ जाहिरात दर वाढविले म्हणून नव्हे, तर एका कर्तृत्ववान नेतृत्वाचा हा सत्कार आहे. मुख्यमंत्री हे शब्द पाळणारे आहेत.

कोल्हापूरकरांना त्यांनी टोलमुक्ती देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी हा शब्द पाळल्याने त्यांचा आम्ही राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा देऊन सत्कार केला. आज त्यांचा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा देऊन सत्कार करीत आहोत, असे डॉ. जाधव म्हणाले.

पारदर्शी कारभार करणारे मुख्यमंत्री आपल्या पन्नास वर्षांच्या पत्रकारितेत आपण अनेक मुख्यमंत्री जवळून पाहिले. एकानेही मराठा आरक्षण दिले नाही. ते काम देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखविले. त्यांनी शिवस्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, मेट्रो प्रकल्प असे अनेक धाडसी निर्णय घेतले. स्व. यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांच्यानंतर पारदर्शक कारभार करणारे आणि स्वच्छ चारित्र्याचे मुख्यमंत्री कोण असतील, तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी अल्पावधीत आपले निर्विवाद नेतृत्व सिद्ध केले, असेही ते म्हणाले. त्यांनी सर्व समाजाचे प्रश्न सोडविण्याच्या घेतलेल्या भूमिकेमुळे आज बहुजन समाजही त्यांच्या बाजूने वळल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकमत मीडियाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा हेतू स्पष्ट करताना, तुमचे आमचे जमेना आणि तुमच्याशिवाय करमेना, असे आमचे आणि सरकारचे नाते आहे. असे मिश्कीलपणे सांगताना देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने राज्याला खंबीर, विचारवंत, उदात्त आणि संयमी नेतृत्व मिळाले आहे. गेली अनेक वर्षे वृत्तपत्राच्या उत्पादन साहित्यात वाढ होत असताना, जाहिरात दर मात्र गेली वीस वर्षे तेवढेच होते. मोठ्या पेपरपासून छोट्या पेपरपर्यंत वृत्तपत्र जिवंत राहतील की नाही, अशी अवस्था होती. अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरातींचे दर वाढवून वृत्तपत्रांना दिलासा दिला. गेली कित्येक दिवस ही मागणी मान्य झाली नव्हती, सतत पाठपुरावा करूनही मागील सरकारच्या काळात कोणी ही परिस्थिती समजून घेतली नव्हती. फडणवीस यांनी प्रश्न मार्गी लावत भरभरून दिले, असेही त्यांनी सांगितले.

श्रीकृष्ण चांडक म्हणाले की, वृत्तपत्रे सरकारची फारशी तारीफ करीत नाहीत. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाने प्रवाह बदलला आहे. वृत्तपत्र व्यवसाय एक तारेवरची कसरत आहे. कागदाचे दर वाढल्याने ही कसरत आणखी कठीण झाली असताना, मुख्यमंत्र्यांनी जाहिरात दर वाढवून आमची ही कसरत कमी केली. ‘इल्ना’चे उपाध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी, सरकारवर टीका करण्याचे काम वृत्तपत्र करीत असतात. मात्र, या सरकारने कधी त्यात कटुता पाळली नाही. उलट वृत्तपत्रांच्या मदतीला धावले असल्याचे ते म्हणाले.

इंडियन एक्स्प्रेसचे चेअरमन विवेक गोयंका यांनी पत्रकारांनी, सरकारचे मित्र असू नये आणि शत्रूही असू नये. असे आपण मानत आलो आहोत. आपण 30 वर्षांत कोणत्याही मुख्यमंत्र्यांचे कौतुक केलेले नाही; पण देवेंद्र फडणवीस त्यास अपवाद ठरले. गुजरात समाचारचे चेअरमन बाहुबली शहा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, विविध वृत्तपत्रांचे मालक व मालक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.