सोलापूर, माढ्यात भाजपसमोर उमेदवारीचा पेच!
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेवर सोलापूर लोकसभा मतदारसंघातून गतवेळी विजयी झालेले खा. शरद बनसोडे यांना निष्क्रिय ठरवत बनसोडेंना पुन्हा उमेदवारी न देता नवीन उमेदवार द्यावा, असा सूर सोलापूर शहर व जिल्हा भाजपमधून काढला जात असल्याने बनसोडेंच्या अडचणीत पक्षानेच वाढ केली आहे. तर माढा लोकसभा मतदारसंघात गतवेळी भाजप पुरस्कृत म्हणून निवडणूक लढवलेले ना. सदाभाऊ खोत यांनी त्यावेळचा त्यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष सोडल्याने आता माढ्यातून कोणाला मैदानात उतरावयाचे याचा शोध भाजपला घ्यावा लागत आहे.

पाच वर्षांची सत्ता असतानाही भाजपला सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे राखण्यासाठी ठोस काहीच करता आले नसल्याचे चित्र आहे. दोन्ही मतदारसंघात भाजपला पुन्हा नव्याने उमेदवार शोधण्याची आलेली वेळ त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे. राजकीय अनुभवाच्या जोरावर मोहिते-पाटील यांनी सत्ता नसतानाही पाच वर्षांत मतदारसंघात कामे करून पकड मजबूत ठेवली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून सहकारमंत्री सुभाष देशमुखांना उतरवले जाईल, अशी चर्चा आहे. देशमुखदेखील स्पष्ट सांगतात की, पक्षाने आदेश दिला तर देशातून कुठेही निवडणूक लढविण्याची माझी तयारी आहे. ते असे म्हणत असतील तरी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ हक्काचा झाल्याने राज्यात पुन्हा सत्ता आल्यास मंत्रिमंडळात मोठ्या संधीची आशा असल्याने देशमुख माढ्यातून लोकसभेसाठी खरेच इच्छुक असतील का, हेदेखील तपासण्याची गरज आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात खा. बनसोडे हे काँग्रेसच्या विरोधात जवळपास दीड लाख मतांनी विजयी झाले होते. त्यावेळी मोदी लाट आणि काँग्रेसविरोधी वातावरण याचा लाभ बनसोडेंना मोठ्या प्रमाणात झाला होता. केंद्र, राज्यासह सोलापूर महापालिकेत भाजपची सत्ता, तर जिल्हा परिषद भाजप पुरस्कृत अशी मजबूत स्थिती असतानाच जिल्ह्यातील अनेक नगरपालिका, नगरपरिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमध्ये भाजपला चांगले यश मिळाले. भाजपची संपूर्ण देशातच ताकद असतानाही सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे खा. बनसोडे यांना उठावदार कामगिरी करता आली नसल्याची ओरड आता त्यांच्याच पक्षातून होऊ लागली आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असताना खा. बनसोडे यांना सोलापूर लोकसभेला पुन्हा उमदेवारी देऊ नका, दिल्यास भाजपचा पराभव निश्‍चित असल्याच्या तक्रारी भाजपमधूनच पक्षश्रेष्ठींकडे होऊ लागल्याने खा. बनसोडेंच्या उमेदवारीवर तगडे प्रश्‍नचिन्ह लागले आहे. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांची मतदारसंघातील पहिली प्रचारफेरीदेखील पूर्ण झाली असताना खा. बनसोडे दिसतही नसल्याच्या तक्रारी आहेत.

भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी ना. सुभाष देशमुख, तर माढा लोकसभेसाठी अविनाश कोळी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. खा. बनसोडे हे पालकमंत्री गटाचे मानले जातात. त्यामुळे खा. बनसोडे यांच्या उमेदवारीला पालकमंत्री गट वगळता सहकारमंत्री गटातून विरोधाचाच सूर असण्याची शक्यता आहे. मुंबईत गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या सोलापूर भाजपच्या बैठकीत बनसोडेंना विरोध झाला आहे. भाजपच्या एका प्रमुख गटाचा जर बनसोडेंना विरोध असेल तर त्यांना उमेदवारी मिळण्याबाबत शंकाच आहे. बनसोडे यांना उमेदवारी न देता भाकरी फिरवण्याचे भाजपने ठरविल्यास भाजपचे राज्यसभा खा. अमर साबळे हे घोड्यावर बसून मैदानात उतरण्याच्या तयारीतच आहेत. आता राष्ट्रवादीतून भाजपात आलेले माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेदेखील पॅड बांधून तयार आहेत. खा. साबळे यांना सहकारमंत्री गटाचा भक्कम पाठिंबा आहे, तर ढोबळे हे पालकमंत्री गटाच्या सहवासात दिसून येतात.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात खा. बनसोडे नको तर कोणाला मैदानात उतरवायचे, असा प्रश्‍न भाजपसमोर जसा आहे तसाच प्रश्‍न माढा लोकसभा मतदारसंघासाठी पण आहे. कारण गतवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी भाजप पुरस्कृत म्हणून कमळाचे चिन्ह न घेता निवडणूक लढवली होती. खोत यांना राष्ट्रवादीचे उमदेवार खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. आता राष्ट्रवादीतून मोहिते-पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. तर खोत यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध लक्षात घेता माढ्यातून कोणाला मैदानात उतरावयाचे, असा प्रश्‍न भाजपसमोर आहे. कारण काँग्रेस व राष्ट्रवादीला यावेळी कोणत्याही परिस्थितीत लोकसभेला जास्तीत जास्त खासदार निवडून आणावयाचे आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेसने आता पक्षांतर्गत वाद क्षमवण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीने तर पक्षासह सर्वच बदल घडविण्यासाठी परिवर्तन यात्रा सुरु केली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येत आणि पक्षांतर्गत वाद मिटवून आगामी निवडणुकीत ताकदीने उतरण्याचा निश्‍चय केला आणि शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील यांनी एकत्रितपणे आपली ताकद पणाला लावली तर काँग्रेसला सोलापूर, तर राष्ट्रवादीला माढा हा आपला बालेकिल्ला राखण्यात यश येण्याची शक्यता आहे. भाजपमधील पक्षांतर्गत गटतट आणि वादाचा लाभ आगामी निवडणुकीत निश्‍चितच दोन्ही काँग्रेसच्या पथ्यावर पडण्याची शक्यता असल्याने भाजपला दोन्ही मतदारसंघांत तगडे आव्हान आहे.

मोहिते-पाटील यांना पक्षातून होणारा विरोध मिटवून माढा लोकसभा आपल्याकडेच राखण्यासाठी दस्तूरखुद्द पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार व अजित पवारांनीच पुढाकार घेतल्याने मोहिते-पाटील यांना पहिल्या क्रमांकाची पसंती आहे.

No comments

Powered by Blogger.