सत्ता परिवर्तन हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवा कामाला लागा: आमदार चव्हाण

रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे यांना एकत्रित हार घातल्यानंतर मान्यवर



सर्वांना बरोबर घेउन जाणारा जिल्हाध्यक्ष

सातारा: पंतप्रधानांनी अर्थसंकल्पात शेतकंर्‍यांसाठी पोकळ घोषणा केल्या आहेत त्यामध्ये भुमिहिन शेतकर्‍यांचा विचार केला नाही. काही मतभेद असतील ते बाजूला सारून सत्ता परिवर्तन हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवा कामाला लागा असे आदेश देउन माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, रणजितसिंहाच्या रुपाने काँग्रेसला लहान, मोठ्या, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बरोबर घेवून जाणारा अध्यक्ष मिळाला आहे.

सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर पदग्रहण समारंभ व जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी आ. जयकूमार गोरे, आ.आनंदराव पाटील, आ. मोहनराव कदम, माजी खा.हिंदुराव नाईक निंबाळकर, धैर्यशील कदम ,मनोहर शिंदे,युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, रजनी पवार ,सुनील काटकर, अ‍ॅड. विजयराव कणसे आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,1999 च्या विशिष्ट परिस्थितीनंतर काँग्रेसच्या बालेकिल्ल्याची 2 शकले पडली.त्यावेळी सहकार चळवळीत पकड मजबूत नसल्याने जिल्ह्यात काँग्रेस पक्ष कमी पडला. जिल्ह्याला उज्वल पंरपरा लाभली आहे. जिल्ह्यने महाराष्ट्राच्या राजकारणाला विचार दिले आहेत. सातारा जिल्ह्यात काँग्रेसची वैभवशाली पंरपंरा पुन्हा उभी करूयात. काँग्रेसला लहान, मोठ्या, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना बरोबर घेवून जाणारा अध्यक्ष मिळाला आहे. पहिल्यांदाच सक्रीय नेते व्यासपिठावर आले आहेत. काँग्रेसला गतवैभव मिळविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात मेळावे घेवून कार्यकर्ते जागे करणे गरजेचे आहे. कोण म्हणतंय पुण्यातुन तर कोण म्हणतंय सांगलीतून तर कोण म्हणतंय नागपूर मधून लढा मी सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिणमधूनच विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. पुन्हा देशात व राज्यात काँग्रेसच्या विचारांचे सरकार आणावयाचे आहे त्यासाठी सर्वांनी हातात हात घालुन काम करूया जिल्ह्यात नवी काँग्रेस उभी करून आपला विजय निश्‍चित झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दुश्मन कोण हे ओळखा : आ. जयकुमार गोरे

दुश्मन कोण आहे हे जर कळत नसेल तर बंदूक कशासाठी हवी आहे? आतापर्यंत जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाने खूप भोगले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा परिषद व जिल्हा बँक ही दोन महत्त्वाची शक्तिस्थाने आहेत. या दोन्ही शक्तिस्थानापर्यंत धडक मारायला पाहिजे. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना ताकद द्यावयाचे काम होते. ही भूमिका घेऊन काम केले पाहिजे, असेही आ. जयकुमार गोरे म्हणाले.

आ. जयकुमार गोरे म्हणाले, भविष्यात इतिहासात नोंद होईल असा नूतन अध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा पार पडत आहे. जिल्ह्यात काँग्रेस कायम एक नंबर होती. प्रेमलाताई काकींच्या काळात काँग्रेसला अनेक संकटे आली त्यावेळी त्यांनी संकटावर मात करत काँग्रेसला उभारी दिली.त्यापासून काँग्रेस पक्षाची गौरवशाली परंपरा जिल्ह्यात सुरू आहे. जी लोकं काँग्रेसच्या ताकदीवर मोठी झाली त्यांनी काँग्रेससोबत प्रतारणा केली.हा जिल्हा काँग्रेसचा आहे तो पुन्हा एक नंबरच राहणार आहे. पृथ्वीराजबाबांनी तरूण युवकाला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. सातारा जिल्ह्यात काँग्रेसने मनात आणले तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करू शकतो. हा आदर्श घेवून येथून पुढे कामाला लागायचे आहे. उपदेशाचे डोस द्यायचे बंद करा, कधी तरी जमिनीवर येवून काम करा. काम करणारा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे. फलटण तालुक्यात 80 हून अधिक गावात बारमाही पाणी आले आता उर्वरित गावात पाणी आणण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले पाहिजेत. पृथ्वीराजबाबा कराड दक्षिणमधून लढणार आणि पुन्हा मुख्यमंत्री होणार, असा विश्‍वासही आ.जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

आ. आनंदराव पाटील म्हणाले, आजपर्यंत काँग्रेस पक्षाला सातारा जिल्ह्याने नेहमीच साथ दिली आहे यापुढेही जिल्हा साथ देणार आहे. भाजप सरकारची लाट होती. परंतु सातार्‍याचा बालेकिल्ला ढासळला नाही. देशातील पाच राज्याच्या निवडणुकीत काँग्रेसचा झंझावात पहावयास मिळाला. सेमी फायनल जिंकली असून आता फायनलही जिंकणार आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षबांधणीसाठी लागेल ती मदत केली जाईल.

जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, सातारा जिल्हा हा क्रांतीविरांचा जिल्हा आहे या जबाबदारीची जाणीव निश्‍चितपणे आहे.काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचे शिवधनुष्य उचलताना दहा वेळा विचार केला कारण सर्वांना बरोबर घेवून जाण्याची जबाबदारी कठीण आहे.अनेक लोकांचा मानसन्मान ठेवावा लागतो.कोणीही दुखावले जाणार नाही, कमीपणा येणार नाही हा मी शब्द देतो.पक्षवाढीसाठी जे जे करावे लागेल त्याला मी कमी पडणार नाही.उद्योगाचे जाळे व व्याप उभे केले तरी ते बाजूला ठेवून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडणार आहे. जिल्ह्याची जबाबदारी सर्वांनाच पेलावी लागणार आहे. काही निर्णय कटुपणे घ्यावे लागणार आहेत.काँग्रेस कार्यकर्त्यांचे रक्षण व संरक्षण केले पाहिजे प्रसंगी संघर्षाला सामोरे जावे लागणार आहे.पुढील मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबाच पाहिजेत हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी काम केले पाहिजेे. तालुकास्तरावर गावोगावी जावू बैठका घेवून तेथील नागरिकांच्या अडीअडचणी समजुन घेतल्या जाणार आहेत. हा ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे. या ठिकाणी लाखाच्यापेक्षा मोठा मेळावा घ्यायला आम्ही तयार आहोत.सत्तेच्या विरोधात संघर्ष करताना हातात हात घालून काम करावे लागणार आहे.चांद्यापासुन बांद्यापर्यंत व गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न केला जाणार आहे.

युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे म्हणाले, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पदग्रहण समारंभ व जाहीर मेळाव्यामुळे काँग्रेस कमिटीमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. युवा चेहरा असणारे जिल्हाध्यक्ष लाभले.पृथ्वीराज बाबांचे हात बळकट करावयाचे असतील तर तळागाळापर्यंत काँग्रेस पक्षाचे विचार पोहोचवले पाहिजेत. काँग्रेसचे विचार व धोरणे माणसा माणसात रुजविली पाहिजेत.युवक काँग्रेसच्या माध्यमातून पुन्हा काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

यावेळी धनश्री महाडीक यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास निरीक्षक प्रकाश सातपुते, बाबासाहेब कदम, प्रल्हाद चव्हाण, रविंद्र झुटींग, नंदाभाउ जाधव,जि.प.सदस्य भिमराव पाटील,अरूण गोरे, अ‍ॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, बाळासाहेब बागवान व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा सत्कार गांधी टोपी व भला मोठा पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

जयकुमार शिंदे यांनी आभार मानले.

No comments

Powered by Blogger.