Your Own Digital Platform

शिवसेना-भाजपची युती विरोधकांच्या पथ्यावर; निवडणुकीत होणार फायदामुंबई: राज्यात भाजप आणि शिवसेनेची होऊ घातलेली युती विरोधकांच्या पथ्यावर पडणार आहे. शिवसेना सत्तेत असूनही शिवसेना सरकारवर टीका करत होती. त्यामुळे एकप्रकारे विरोधकांची जागाही शिवसेनेने व्यापली होती. मात्र, आता युती झाल्याने शिवसेनेमुळे विरोधकांचे होणारे मतविभाजन टाळले जाईल, अशी आशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला वाटत आहे.

केंद्रातील आणि राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी असूनही भाजप आणि शिवसेनेचा नेहमीच 36 चा आकडा राहिला आहे. सत्तेत मंत्री असूनही केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या अनेक धोरणांवर कधी जाहीर भाषणांमधून तर कधी ’सामना’मधून टीका होत राहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत की पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत शिवसेनेने खालच्या थरावर जाऊन या दोघांवर टीका केली. लोकसभा असो की विधानसभा दोन्हीकडे सरकारच्या धोरणावर शिवसेनेचे खासदार आणि आमदार तुटून पडायचे. विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आहे की शिवसेना असे वातावरण या चार वर्षात अनुभवायला मिळाले. आता आता युती झाल्याने शिवसेना-भाजपने पु्न्हा हातात हात घेतला असून शिवसेना यापुढे सत्ताधारी पक्षासारखे वागणार यात शंका नाही.

शिवसेना-भाजपाची युती झाल्याने आता राज्यात शिवसेना भाजपाविरोधात किंवा सरकारविरोधात एक चकार शब्द काढणार नाही. त्यामुळे साहजिकच विरोधी पक्षांची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला व्यापता येणार आहे. युती झाली नसती तर भाजपाविरोधातील मते शिवसेनेला मिळाली असती, तिच मते आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळतील, अशी आशा या दोन्ही पक्षांना आहे. शिवसेनेला मत म्हणजे मोदींना मत हे आता स्पष्ट झाल्याने विरोधी पक्षांना राज्यात विरोधी पक्षाच्या जागा मोकळी झाली आहे

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यातील विधानसभेच्या निकालाने देशातील वातावरण बदलत असल्याची जाणीव भाजपाला झाली. त्यामुळे एनडीएमधील मित्र पक्ष टिकवण्यासाठी भाजपाची धावपळ सुरू झाली. बिहारमध्ये 22 खासदार असूनही भाजप 17 जागा लढवत आहे. महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत ठेवण्यासाठी शिवसेनेने केलेली जहरी टीका विसरून भाजपचे नेते मातोश्रीच्या पायर्‍या चढणार आहेत. त्याचे फलित म्हणजे शिवसेनेने स्वबळाच्या घोषणेवरून घुमजाव करून युतीची मोट बांधली आहे. मात्र, गेल्या चार वर्षात भाजप आणि शिवसेना समर्थकांमध्ये टोकाचे वाद निर्माण झाले आहेत. युती झाली तरी दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी एकत्र येऊन काम करणं आणि एकमेकांची मते मिळवणे हे आव्हान दोन्ही पक्षांसमोर आहे.