Your Own Digital Platform

भारताला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा

स्थैर्य, ऑनलाईन: भारताला आत्मरक्षणाचा पूर्ण अधिकार असून आमचा भारताला पाठिंबा आहे असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी सांगितले. पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली. बोल्टन यांनी डोवल यांच्याबरोबर बोलताना पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले तसेच दहशतवादाविरुद्ध लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

मी अजित डोवल यांच्याबरोबर दोन वेळा चर्चा केली. पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल अमेरिकेच्यावतीने मी दु:ख व्यक्त केले. भारताला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार असून आमचा पाठिंबा असल्याचे त्यांना सांगितले असे जॉन बोल्टन म्हणाले. दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद करा हे आम्ही आधीच पाकिस्तानला स्पष्ट केले आहे असे बोल्टन म्हणाले.

पाकिस्तानने दहशतवादी गटांना पाठिंबा व आश्रय देणे थांबवावे, असा इशारा अमेरिकेने पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर दिला आहे. व्हाइट हाऊसने सांगितले, की पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे 40 जवान ठार झाल्याच्या घटनेचा अमेरिका तीव्र निषेध करीत आहे. व्हाइट हाऊसच्या प्रसिद्धी मंत्री सारा सँडर्स यांनी सांगितले, की पाकिस्तानने दहशतवादी गटांना पाठिंबा देणे व त्यांच्या देशातून कारवाया करण्यास मोकळे रान देणे या दोन्ही गोष्टी थांबवाव्यात. या भागात दहशतवाद व हिंसाचार पसरवण्याचा पाकिस्तानचा हेतू आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे अमेरिका व भारत यांच्यातील दहशतवादविरोधी सहकार्य आणखी मजबूत होईल हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे.