Your Own Digital Platform

सातारा जिल्हा बँकेने शेतकर्‍यांसाठी उचललेले पाऊल प्रेरणादायी: ना.श्रीमंत रामराजे

फलटण : फलटण, खंडाळा तालुक्यातील कायम दुष्काळी परिस्थिती बदलण्यासाठी राजकीय सत्तेची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर येथील सर्वसामान्य जनतेने मोठ्या विश्‍वासाने आपल्याला अपक्ष म्हणून विधानसभेत पाठविले, त्याचा योग्य उपयोग करुन घेत या दोन्ही तालुक्यात कृषी, जल, औद्योगिक क्रांतीद्वारे झालेल्या बदलातून दुष्काळ तर कायमचा हटलाच परंतू शेतकर्याची नवी पिढी हा भाग सुजलाम, सुफलाम करण्यात गुंतला असताना जिल्हा बँकेने त्यांना योग्य वेळी अधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी उचललेले पाऊल प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि रामदास कदम मित्रमंडळ, गिरवी यांच्या संयुक्त सहभागाने गिरवी ता. फलटण येथे आयोजित शिवार फेरी व शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकेचे व्हा. चेअरमन सुनिल माने होते. यावेळी मुंबई बाजार समितीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोळसकर, बँकेचे संचालक प्रकाश बडेकर, प्रा. अर्जुन खाडे, सौ. सुरेखाताई पाटील, रामदास कदम, द्राक्ष बागायतार संघाचे उपाध्यक्ष शहाजीराव जाचक, राजेंद्र कदम, राजेंद्र जठार, दिलीप अहिरेकर, तालुका कृषी अधिकारी गोरखनाथ डोईफोडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, एम.व्ही.जाधव यांच्यासह बँकेचे अन्य अधिकारी, तालुक्यातील विविध संस्थाचे पदाधिकारी आणि गिरवी व पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नीरा उजवा कालव्याद्वारे या तालुक्यात सुमारे 100 वर्षापूर्वी पाटाद्वारे प्रथम पाणी मिळाले त्यातून तालुक्याचा काही भाग बागायती झाला मात्र उर्वरित गावे पाऊसमान कमी होत गेल्याने दुष्काळाच्या सावटाखाली येत राहील जसा दुष्काळ वाढत गेला तसा या भागातील शेतकरी निसर्गापुढे हतबल होवून मुंबईत काबाड कष्ट उपसत राहिला मात्र त्याची शेती करण्याची, काळी आई फुलविण्याची उर्मी कायम होती त्यातून प्रामुख्याने या दुष्काळाशी सामना करणार्या शेतकर्यांनीच आपल्याला अपक्ष म्हणून विधानसभेत पाठविण्याचा चंग बांधला आणि विधानसभेत पोहोचल्यावर आपली जबाबदारी ओळखून त्याचबरोबर या लोकांची भावना जाणून घेवून आपण गेली 25 वर्षे सतत कायम दुष्काळी पट्टयातील शेतीला पाटाचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी झगडत राहिलो परिणामी राज्यातील कायम दुष्काळी तालुक्यात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून पाणी पोहोचविताना बच्छावत आयोगाच्या सूचनेनुसार ऑगस्ट 2000 पर्यंत राज्याच्या वाट्याचे पाणी अडविले गेले नाही तर त्यावरील राज्याचा हक्क संपणार असल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रश्‍नाला सर्वांचाच पाठींबा मिळविण्यात आपण यशस्वी झालो आणि खर्या अर्थाने कायम दुष्काळी पट्टयाला न्याय देण्याचे आपले स्वप्न पूर्णत्वास गेल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

फलटण, खंडाळा तालुक्याला नीरा उजवा कालव्याद्वारे उपलब्ध झालेल्या पाण्यातून जो भाग बागायती झाला तेथील शेतकर्याने तत्कालीन परिस्थितीनुसार ऊसाच्या पीकाला प्राधान्य दिले त्यातून मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती आणि साखर कारखान्यांची उभारणी झाली मात्र प्रत्यक्षात अती पाण्याने ऊसाच्या क्षेत्रातील जमिनींचा पोत खराब झाला, त्यांची एकरी उत्पादकता घटली काही ठिकाणी आता ह्या जमिनी नापेर होण्याचा धोका निर्माण झाला असल्याने नीरा उजवा कालव्याद्वारे भिजणार्या मर्यादित क्षेत्राचा विचार करुन आगामी काळात संपूर्ण तालुका बागायत होत असताना या क्षेत्रात ऊसाबरोबर अन्य कोणती पीके घ्यावीत यासाठी शेतकर्यांनी विचार करण्याची आवश्यकता असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

आपण ऊस पीक किंवा साखर कारखानदारीच्या विरोधात नक्की नाही, साखर कारखानदारी आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून या राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती प्राप्त झाली याबद्दल आपले दुमत नाही मात्र ऊसाच्या पीकाला द्यावे लागणार्या अमाप पाण्यातून शेती व शेतकर्याचे होणारे नुकसान लक्षात घेवून आगामी काळात ऊसाची शेती करताना त्यासाठी ठिबक व तुषार सिंचन योजनेचा वापर करुन एकरी अधिक उत्पादन देणार्या ऊसाच्या जातीचा प्राधान्याने वापर केला पाहिजे, आपल्याकडील क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्रावर ऊस आणि उर्वरित क्षेत्रावर द्राक्ष, डाळींब, चिक्कू, पेरु वगैरे फळबागा केल्या पहिजेत त्यासाठी साखर कारखान्याप्रमाणेच फळप्रक्रिया उद्योगांची उभारणी या दोन्ही तालुक्यात करण्याला आपण निश्‍चितपणे सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही देत कोणत्याही परिस्थितीत मोठ्या कष्टाने या तालुक्याच्या कायम दुष्काळी पट्यात पोहोचलेले पाणी या तालुक्याचा शेतकरी सुखी, समाधानी आणि नवी पिढी हा तालुका सुजलाम, सुफलाम करण्यात आघाडीवर असल्याचे चित्र पाहण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

आपणच काय ब्रिटीशांनीही पाणी हेच जीवन याची ग्वाही देत, पाणी हे द्रवरुप सोने असल्याच्या भावनेतून पाण्याचे योग्य नियोजन आपण केले त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाणी उपलब्ध झाले तरी बदलत्या निसर्गामुळे शेतीचे उत्पन्न घटत राहीले त्यावर योग्य उपाय योजना करण्यासाठी या भागात हवामानाची नित्य माहिती देणारे केंद्राची उभारणी करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत तथापी रामदास कदम यांनी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने उभारलेल्या द्राक्ष पेरुच्या बागा व त्यातून शेती फुलविण्यासाठी निसर्गाचा होणारा अडथळा दूर करण्याच्या उद्देशाने छोटे हवामान केेंद्र उभारुन, संपूर्ण द्राक्षबागेला शेडनेटचा वापर आणि रसायनमुक्त शेती याद्वारे खर्या अर्थाने शेती फायदेशीर करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न दोन्ही तालुक्यातील शेतकर्यांनी समजावून घेतले पाहिजेत यासाठीच याभागात शिवार फेरी आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करुन तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्याचा बँकेचा प्रयत्न निश्‍चित या तालुक्यातील शेतीला नवे स्वरुप देणारा ठरेल याची ग्वाही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

धोम-बलकवडी हे पूर्णत्वास गेलेले आणि नियोजनाप्रमाणे संपूर्ण लाभक्षेत्रात पाणी पोहोचविणारे महाराष्ट्रातील एकमेव धरण असून त्यातून आपल्या या क्षेत्रातील कामाची नोंद इतिहासात निश्‍चित होईल मात्र त्याच्यापेक्षा या पाण्यातून कायम दुष्काळी असा असलेला या दोन्ही तालुक्याचा शिक्का पुसण्यात आणि शेतकर्याची नवी पिढी खर्या अर्थाने हा तालुका सजलाम, सुफलाम करण्यात यशस्वी झाल्याचे पाहण्यात आपल्याला मोठे समाधान असल्याचे नमुद करीत त्यासाठीच हा प्रयत्न असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नेहमीच शेती व शेतकर्यांच्या हिताला प्राधान्य दिले असून शेतीला योग्य दिशा देणारा कार्यक्रम या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करुन त्याच्या पूर्ततेसाठी गेली 68 वर्षे ही बँक कार्यरत असल्याचे निदर्शनास आणून देत निर्धारित कामात यशस्वी होवून योग्य लाभार्थ्यार्पर्यंत शेती व उद्योगाचे तंत्रज्ञान पोहोचवून त्याला अर्थकारणाची जोड देण्यात बँक यशस्वी झाल्यानेचे या बँकेने नाबार्डचे अनेक पुरस्कार मिळविले असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, महाराष्ट्र डाळींब उत्पादक संघाचे उपाध्यक्ष शहाजीराव जाचक, श्रीराम कारखान्याचे संचालक शिवराज कदम यांनीही यावेळी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.

प्रारंभी प्रगतशील शेतकरी रामदास कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी धोम-बलकवडी धरणाचे पाणी या भागात पोहोचविल्याने आता खर्या अर्थाने या भागातील शेतकरी सुखी, समाधानी होणार असल्याचे नमूद करीत या पाण्याला जिल्हा बँकेने शेतीचे नवीन तंत्रज्ञान, द्राक्ष बागायतादार संघाच्या माध्यमातून फळबागांसाठी मार्गदर्शन उपलब्ध होत असल्याने आगामी काळात हा कायम दुष्काळी पट्टा निश्‍चित प्रगतीच्या सर्वोच्च स्थानावर असेल याची ग्वाही रामदास कदम यांनी दिली.

या कार्यक्रमातच विविध भागातील प्रगतशील शेतकर्यांचा सन्मान करुन त्यांच्या शेती क्षेत्रातील प्रगतीबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. बँकेचे व्यवस्थापक सुजित शेख यांनी सुत्रसंचालन आणि भूपेश कदम यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.