माढ्याची जबाबदारी रामराजेंकडे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच माढा लोकसभा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार असणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पवार यांच्या या निवडणुकीची जबाबदारी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्याकडे असणार आहे.

या निवडणुकीच्या तयारीसाठी निंबाळकर यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. त्यात ही घोषणा होण्याची शक्यता आहे. माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी काल नवी दिल्ली येथे पवारांची भेट घेतली होती. मोहिते यांचे समर्थक हे नाराज झाल्याची चर्चा होती. त्यांची समजूत कालच्या बैठकीत काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.

रामराजे यांचा जुना विधानसभा मतदारसंघ असलेला फलटणचा (जि. सातारा) समावेश हा माढा लोकसभा मतदारसंघात होतो. तसेच सातारा जिल्ह्यातील माण-खटाव हा विधानसभा मतदारसंघही माढा लोकसभा मतदारसंघात येतो. निंबाळकर यांना या मतदारसंघांची खडानखडा माहिती असल्याने साहजिक त्यांच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे मातब्बर नेते माढा लोकसभा मतदारसंघात आहेत. विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह आमदार बबनदादा शिंदे, रश्मी बागल, शेकापचे आमदार गणपतराव पाटील यांचा समावेश आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. या सर्व नेत्यांशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी रामराजेंकडे असणार आहे.

No comments

Powered by Blogger.