Your Own Digital Platform

पवारसाहेबांना मताधिक्य देण्याचा निर्धार:रामराजे
फलटण : राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेच्या वेळी सन 1999 मध्ये खा. शरद पवार यांना देशातील सर्वोच्च स्थानावर पाहण्याचे स्वप्न आम्ही सातारकरांनी पाहिले होते या वेळच्या लोकसभा निवडणूकीनंतर ते स्वप्न प्रत्यक्षात येणार असल्याची चिन्हे लक्षात घेऊन यावेळी खा. शरद पवार यांना माढा लोकसभा मतदार संघातून सर्वाधिक मतांनी विजयी करण्याचा निर्धार आम्ही सर्वांनीच केला असल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत फलटण कोरेगाव आणि माण खटाव विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी प्रमुख कार्यकर्त्यांच्या फलटण येथील संवाद मेळाव्यात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते.

केंद्रातील सरकारची भूमिका आणि धोरणांबाबत देशभर असलेल्या नाराजीतून देशातील विविध राजकीय पक्षांनी केलेल्या महाआघाडीतील नेते, देशातील अनेक राज्याचे मुख्यमंत्री व अन्य राजकीय मंडळींनी पवार लोकसभेत असले पाहिजेत अशी भूमिका घेऊन आपण सातारकरांनी पाहिलेले स्वप्न आता संपूर्ण देशाने पाहिले आहे त्याच्या पूततेची वेळ आली असून यावेळी एकजुटीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून खा. पवार यांचेसह महाआघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याची आवश्यकता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्टपणे नमूद केली.

खा. शरद पवार दिल्लीत असणे आवश्यक

केंद्रात मनमोहन सिंग सरकारच्या कार्यकाळात जलसंधारण, कृषी व अन्य जनहिताच्या योजना साठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध झाला त्यावेळी तसेच शेती व पाण्याचे प्रश्न, महिलांविषयी ग्रामीण भागातील विकासासाठी मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून खासदार पवार यांनी घेतलेले निर्णय किंवा केंद्रातील मंत्री मंडळ व लोकसभा उपसमित्यांचे प्रमुख म्हणून घेतलेले निर्णय, त्याद्वारे खा. पवार यांनी देशातील शेती व शेतकर्यांच्या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला म्हणूनच खा. पवार दिल्लीत असल्याची आवश्यकता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केली.

खा. पवार यांची उमेदवारी आपल्या भाग्याची

देशातील शेती व शेतकरी, सर्वसामान्य माणूस किंबहुना देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याची स्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर खा. पवार यांनी माढ्यातून आपली उमेदवारी जाहीर करणे ही बाब आमच्यासाठी भाग्याची असून हे भाग्य आम्ही मिळविणारच याची ग्वाही देत राज्यातील राष्ट्रवादीच्या सर्व जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागावे अशा स्पष्ट सूचना श्रीमंत रामराजे यांनी यावेळी दिल्या.

अर्थव्यवस्था, सहकार, साखर कारखाने उध्वस्त करण्याची धोरणे

प्रारंभी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्ताविकात सद्य राजकीय स्थितीचा आढावा घेताना देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे, ग्रामीण भाग असणारी शेती व सहकार चळवळ, साखर कारखानदारी आणि दुग्ध व्यवसाय उध्वस्त करण्याची पावले गेल्या चार व साडेचार वर्षात टाकली गेल्याने आता सर्वसामान्य माणूस सत्ताबदल केला पाहिजे असा निर्धार करुन त्यासाठी सज्ज असल्याच्या पार्श्वभूमीवर खा. पवार यांची उमेदवारी दिलासा देणारी असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रा. कविता म्हेत्रे यांची समयोचित भाषणे झाली.

आ. दिपकराव चव्हाण यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.