वाळू माफिया, पोलीस व महसूल विरोधात रघुनाथराजे आक्रमक





हरित लवादाकडे व उच्च न्यायालयात याचिका दाखल

फलटण
: वाळू माफियांना सहकार्य करणार्‍या पोलीस व महसूल यंत्रणेविरुद्ध फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्यावतीने हरित लवादाकडे व उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. याबाबतची नोटीस उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण यांना पाठवण्यात आली आहे. आता तरी वाळू माफिया, पोलीस व महसूल प्रशासनाला चाप बसेल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

फलटण तालुक्यात वाळू माफियांनी एवढा उच्छाद मांडला आहे की, शेतकर्‍यांचे पाणी शेतापर्यंत पोहोचत नाही. शिवाय पर्यावरणाचाही मोठा र्‍हास होत आहे. पोलीस व महसूल खाते याकडे लक्ष देत नाहीत. वाळू माफियांना सहकार्य करणार्‍या महसूल अधिकारी व हप्ते घेणार्‍या पोलीस प्रशासनाच्या विरोधात फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी ऍड. असिम सरोदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात व हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे.

या याचिकेमध्ये म्हटले आहे की, फलटण तालुक्यात बाणगंगा नदी तसेच अनेक नाले, नहर इत्यादीद्वारे शेतीचे सिंचन केले जाते. तालुक्यात आलेल्या धोम-बलकवडी कॅनॉलद्वारे शेतकर्‍यांना पाणी पोहोचवले जात आहे. परंतु वाळू माफियांनी या सर्व क्षेत्रात वाळू उपसा करुन एवढे मोठे खड्डे करून ठेवले आहेत की, धोम-बलकवडी कॅनॉलद्वारे सुटलेले पाणी तीन दिवस झाले तरी पुढे जात नाही.

परिणामी शेतकर्‍यांना पिकासाठी पाणी उपलब्ध होताना बर्‍याच अडचणी निर्माण झाल्या आहेत. हे कुठेतरी थांबण्यासाठी वाळू माफिया, त्यांना सहकार्य करणार्‍या महसूल अधिकारी व हप्ते घेणार्‍या पोलीस प्रशानसनाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. नोटीस मिळाल्यापासून आठ दिवसाच्यात कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आयजी नांगरे-पाटील यांनाही पाठवली क्लिप

फलटण तालुक्यात सध्या एक ऑडिओ क्लिप फिरत आहे. त्यामध्ये एक वाळू माफिया व पोलीस कर्मचारी यांचे संभाषण आहे. वाळू माफियाला किती वाळूच्या गाडीला किती हप्ता द्यावा लागेल व हा हप्ता वर कोणाकोणाला दिला जातो याचा उल्लेख आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मांजरे हे रुजू झाल्यापासून वाळू माफियांना अभय दिल्याचे जाणवत आहे. वाळू उपसा जोरदारपणे सुरु असल्याचे दिसत आहे. वाळू उपशाला बंदी असून शासनाचा आदेश डावलून वाळूचे आपणच मालक असल्याचे अर्विभावात कोट्यावधींच्या वाळू चोरीस हातभार लावत आहेत. आयजी विश्‍वास नांगरे पाटील यांना ही ऑडिओ क्लिप रघुनाथराजे यांनी पाठवलेली आहे. आता नांगरे-पाटील यांनी वाळूमाफियांवर मोक्कांतर्गत कारवाई करुन भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

No comments

Powered by Blogger.