Your Own Digital Platform

हाफ मर्डरप्रकरणी सक्तमजुरी व दंड

सातारा : फडतरवाडी, ता. फलटण येथील दोघांना मारहाण करून, त्यांच्यावर तलवारीने वार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न (हाफ मर्डर) केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी पाच जणांना 7 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी 12 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली.

याबाबत अधिक माहिती अशी, राजेंद्र पांडुरंग फडतरे हे बंधू रमेश पांडुरंग फडतरे (दोघे रा. फडतरवाडी, ता. फलटण) यांच्यासमवेत 24 ऑगस्ट 2013 रोजी दुचाकीवरून शेतात निघाले होते. त्यावेळी सामायिक जागेत विजेचा खांब रोवण्याच्या कारणावरून दत्तात्रय शंकर फडतरे, बाळू दत्तात्रय फडतरे, नितीन प्रकाश जाधव, विनोद प्रकाश जाधव, संतोष दत्तात्रय फडतरे यांनी राजेंद्र फडतरे आणि रमेश फडतरे यांचा रस्ता अडवला. दोघांना दमदाटी व मारहाण केली. याचवेळी राजेंद्र फडतरे यांच्यावर तलवारीने वार झाल्याने ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले.

राजेंद्र फडतरे हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना प्रथम फलटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयात जावून पाहणी केली. त्यानुसार घटनेची तक्रार रमेश फडतरे यांनी पोलिसांनी दिली. फलटण ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या प्रकरणाचा तपास सपोनि आर.एस. गायकवाड यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

जिल्हा न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरु झाल्यनंतर एकूण 16 साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, पंच यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. जिल्हा सरकारी वकील महेश कुलकर्णी यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी राजेंद्र पांडुरंग फडतरे यांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि रमेश पांडुरंग फडतरे यांना मारहाण केल्याप्रकरणी दत्तात्रय फडतरे, बाळू फडतरे (हे सध्या मृत झाले आहेत.), नितीन जाधव, विनोद जाधव, सतीश फडतरे या पाच जणांना 7 वर्षा?ची सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी 12 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार अमित भरते यांनी सहकार्य? केले.

दरम्यान, न्यायालयाने आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावल्यामुळे आम्हाला न्याय मिळाला. याप्रकरणी फलटण पोलिस, वैद्यकीय अधिकारी प्रसाद जोशी, सरकारी वकील यांचे सहकार्य? मिळाल्यामुळेच आरोपींना शिक्षा झाली अशी प्रतिक्रिया फिर्या?दी रमेश फडतरे यांनी व्यक्त केली.