युतीसाठी काय पण; पंतप्रधान मोदींच्या हस्ते बाळासाहेबांच्या स्मारकाचे भूमिपूजन?

मुंबई: आगामी निवडणुकीत युतीसाठी राजी झाल्यानंतर भाजपकडून शिवसेनेचे सर्व लाड पुरवले जाताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे आमदार असलेले पालघरसारखे अनेक मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला सोडण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानंतर आता शिवसेनेला खूश करण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा मुहूर्तही निश्चित करण्यात आल्याचे समजते. एवढेच नव्हे तर हे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, अशी चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 24 फेब्रुवारीला हा कार्यक्रम पार पडेल. मात्र, पंतप्रधान कार्यालयाकडून अद्याप वेळ निश्चित न करण्यात आल्यामुळे याबाबतची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, एकूणच युतीसाठी भाजपने शिवसेनेपुढे नमते घेतल्याचे चित्र दिसत आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सोमवारी संध्याकाळी पाच वाजता मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर दोन्ही नेते पत्रकार परिषद घेतील. यावेळी युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यापूर्वी सर्व समविचारी पक्षांशी युतीची औपचारिक बोलणी करण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेले महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. त्यामुळेच भाजपने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत._

No comments

Powered by Blogger.