श्री. छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन
सातारा: सातार्‍याचे भाग्य विधाते, माजी सहकारमंत्री श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या स्मृती दिनानिमीत्त सोमवार दि. 4 रोजी विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गांधी मैदान, राजवाडा येथे सोमवारी सायंकाळी 6.30 वाजता विनोदाचार्य ह.भ.प. बाबा महाराज इंगळे (बीड) यांच्या सुश्राव्य किर्तन व प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे.

स्व. अभयसिंहराजे तथा भाऊसाहेब महाराज यांच्या स्मृतीदिनानिमीत्त शाहुनगर- शेंद्रे ता. सातारा येथे अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सोमवारी सकाळी 9.30 वाजता अजिंक्य उद्योग समुहाच्यावतीने स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पांजली अर्पण व पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन कार्यक्रम होणार आहे. सकाळी 10 वाजता वेदांत क्लिनिकचे डॉ. अमोल ढवळे यांच्यावतीने पोवई नाका येथील रॅमसन कलर लॅब (पारिजात कॉम्प्लेक्स) येथे अस्थिरोग, हाडांची ठिसुळता आणि बालरोग तपासणीचे मोफत शिबीर होणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत शेंद्रे येथील अभयसिंहराजे भोसले तंत्रनिकेतन येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज आणि लायन्स क्लब सातारा अजिंक्य यांच्या संयुक्त विद्यमाने कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे चुंबकीय उपचार व निसर्गोपचार मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दि. 4 फेब्रुवारी ते 16 मार्चअखेर सुरु राहणार आहे.

कळंबे येथील सुविध्या माध्यमिक विद्यालयात राजेंद्र लवंगारे यांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता बळीराजा सामाजिक संस्था करंजे तर्फ रामकुंड यांच्यावतीने शिवशंभो महादेव मंदीर, दौलतनगर येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंचणी येथे ग्रामस्थांच्यावतीने भजन, किर्तन व अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच सातारा नगरपरिषद, सातारा पंचायत समिती, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयातही विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. भरतगाव येथील भैरवनाथ सामाजिक विकास संस्थेच्यावतीने अभिवादन कार्यक्रम होणार आहे. रिमांडहोम येथे प्रकाश बडेकर मित्रसमुहाच्यावतीने मुलांना अन्नदान केले जाणार आहे. यासह विविध ठिकाणी सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम, खाऊ वाटप आदी कार्यक्रम होणार आहेत.

सायंकाळी 6.30 वाजता राजवाडा, गांधी मैदान येथे कर्तव्य सोशल ग्रुपच्यावतीने भारतात प्रवचनाची पताका उंचविणारे थोर समाजप्रबोधनकार आणि समाजसुधारक विनोदाचार्य ह.भ.प. बाबा महाराज इंगळे (बीड) यांच्या सुश्राव्य किर्तन व प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास ह.भ.प. महाराष्ट्रभूषण मदनमहराज कदम, ह.भ.प. प्रवीण महाराज शेलार यांच्यासह गुरुकूल श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था आंबेघर (मेढा), ह.भ.प. बबनराव सापते, ह.भ.प. श्रीपती माने, ह.भ.प. उमेश किर्दत महाराज यांची साथ लाभणार आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन कर्तव्य सोशल ग्रुपच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.