Your Own Digital Platform

स्वप्नपूर्तीची ‘आनंदी’: आनंदी गोपाळ’

डॉ. आनंदीबाई जोशी हे नाव आजही मोठ्या आदरानं महाराष्ट्रातच नाही तर जगभरात घेतलं जातं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून आनंदीबाई शिकल्या, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला. ज्या शतकात स्त्रियांना उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, त्या एकोणिसाव्या शतकात आनंदी गोपाळ जोशी बोटीने अमेरिकेला गेल्या. तेव्हा त्या 18 वर्षांच्या होत्या. चार वर्ष परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर भारतात परतल्या. त्यांचा हा जीवनप्रवास ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटातून उलगडण्यात आला आहे.

1875 ते 1887चा काळ, ज्यावेळी रुढी आणि परंपरा यांचा प्रचंड पगडा होता. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले जीवित कार्य जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री म्हणून आनंदी गोपाळ आजही ओळखल्या जातात. तेव्हाचा तो काळ अत्यंत प्रभावीपणे या चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. तो काळ आणि आनंदी-गोपाळ या दाम्पत्याचा परिस्थितीबरोबरचा संघर्ष अनुभवायचा असेल तर ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट नक्की बघावा.

आनंदीबाईंच्या भूमिकेतील भाग्यश्री मिलिंद आणि गोपाळराव यांच्या भूमिकेतील ललित प्रभाकर यांनी उत्तमरित्या भूमिका साकारल्या. पटकथाकार-संवादलेखन आणि दिग्दर्शनही प्रभावी आहे. यामध्ये छोटी यमू म्हणजेच आनंदीबाईंच्या बालपणीच्या भूमिकेत दिसणार्‍या अंकिता गोस्वामी हिनेही सुरेख अभिनय केला आहे. एकोणिसाव्या शतकातील सामाजिक-सांस्कृतिक चित्र अत्यंत नेमकं उतरलं आहे. कलाकारांचं दमदार अभिनय ही या चित्रपटाची जमेची बाजू ठरते. विक्षिप्त स्वभावाच्या गोपाळरावांची भूमिका ललितने अप्रतिम साकारली.

चित्रपटात आवश्यक तिथे लेखक-दिग्दर्शकाने सिनेमॅटिक लिबर्टी घेतली आहे. संगीताच्या माध्यमातूनही बर्‍याच गोष्टी व्यक्त होऊ शकतात ही बाब अचूकपणे हेरत ‘आनंदी गोपाळ’ला पार्श्वसंगीत देण्यात आलं आहे. गरज म्हणून घातलेली गाणी प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतात. प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी-गोपाळ या जोडप्याने अशक्य ते शक्य करुन दाखवलं. इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर काहीच अशक्य नसतं हा प्रेरणादायी संदेश या चित्रपटातून मिळतो.

दिग्दर्शक : समीर विद्वंस

निर्माते : फ्रेश लाईम फिल्म्स, झी स्टुडिओज

भूमिका : ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद, अंकिता गोस्वामी आणि इतर