Your Own Digital Platform

श्रेष्ठ संसद आणि पार्लमेंटरी ग्रुप फॉर चिल्ड्रन पुरस्काराने सुप्रिया सुळे सन्मानित

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना सुप्रिया सुळेबारामती : दिल्ली येथील फेम इंडियाचा श्रेष्ठ सांसद तसेच युनिसेफ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थांच्या वतीने देण्यात येणारा ‘पार्लमेंट्रीयन्स अवार्ड फॉर चिल्ड्रन’ हे दोन पुरस्कार खासदार सुप्रिया सुळे यांना प्रदान करण्यात आले.

दिल्ली येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते श्रेष्ठ सांसद तर ‘स्वनिती’च्या उमा भट्टाचार्य आणि युनीसेफच्या अमृता सिंग यांच्या उपस्थितीत पार्लमेंट्रीयन्स अवार्ड फॉर चिल्ड्रन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या मतदार संघात खासदारांनी केलेली कामे, संसदेतील उपस्थिती, संसदेत त्यांनी उपस्थित केलेले प्रश्‍न, त्यांनी मांडलेली खासगी विधेयके, चर्चासत्रातील सहभाग अशा विविध मुद्द्यांवर फेम इंडिया या संस्थेच्या सर्व्हेक्षणातून निवडक खासदारांची निवड करण्यात आली.

राज्यातील मुकबधीर मुले आणि अंगणवाड्या, आशा वर्कर्स तसेच शालेय शिक्षण आणि शिक्षकांसाठी सातत्याने सुळे या कार्यरत आहेत. स्टार्की फौंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, टाटा ट्रस्ट, तसेच पवार पब्लिक चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मुकबधीर मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्रे बसविण्याचा कार्यक्रम त्या घेत असतात. नुकतेच त्यांनी पुण्यात घेतलेल्या या कार्यक्रमाची ‘गिनीज वर्ल्ड रेकोर्ड बुक’ने सुद्धा दखल घेतली. या कार्यक्रमात आठ तासांत तब्बल 4 हजार 846 जणांना श्रवणयंत्रे बसवून जागतिक विक्रम करण्यात आला.

याबरोबरच त्या विद्यार्थिनींना आणि आशा वर्कर्स यांना गेल्या वर्षी पंधरा हजार सायकली वाटल्या. तर अंगणवाडीतील मुलांना स्वच्छ पाणी, वीज, सकस पोषण आहार आणि अन्य सुविधा देण्यासाठी त्या कार्यशील आहेत. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्रापासून राज्य शिक्षण विभागापर्यंत त्यांचा पाठपुरावा सुरु असतो. या सर्व कामांची दखल घेत ‘युनिसेफ’ आणि ‘पार्लमेंट्री ग्रुप फॉर चिल्ड्रन’ या संस्थांच्या वतीने देण्यात येणारा ‘पार्लमेंट्रीयन्स अ‍ॅवार्ड फॉर चिल्ड्रन’हा पुरस्कार सुळे यांना देण्यात आला.

हा जनतेचा सन्मान : सुळे

फेम इंडिया या संस्थेतर्फे सर्वोत्कृष्ट संसदीय कायार्साठी दिला जाणारा ‘श्रेष्ठ सांसद अवार्ड’ आणि युनिसेफचा ‘पार्लमेंट्रीयन्स अवार्ड फॉर चिल्ड्रन’ हे पुरस्कार मला मिळाले. माझा मतदारसंघ आणि राज्यातील जनतेचा विश्‍वास यांच्या बळावर संसदेत मला त्यांचे प्रश्‍न मांडता आले. हा सन्मान माझ्यापेक्षा माझ्यावर विश्‍वास ठेवणार्‍या तमाम जनतेचा आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरस्कार स्वीकारताना भावना व्यक्त केल्या.