Your Own Digital Platform

आरक्षणाचा भाजपने मांडला खेळखंडोबा: प्रकाश शेंडगे

ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समितीचा 25 फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर एल्गार मोर्चा

सातारा
: मराठा समाजावर मागासलेपणाचा शिक्का मारुन सरकारने समाजात तेढ निर्माण केला आहे. मराठा समाजाचे शासनाच्या निर्णयामुळे नुकसानच झाले असून भाजप सरकारने आरक्षणाचा खेळखंडोबा मांडला आहे, असा आरोप माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत केला. ओबीसी, व्हीजेएनटी संघर्ष समितीच्यावतीने विविध मागण्यांसाठी सोमवार, दि. 25 फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे, याची माहिती देताना शेंडगे बोलत होते.

शेंडगे म्हणाले, भाजप सरकारने मराठा आरक्षण जाहीर करुन निवडणूक जुमला साधला आहे. वास्तविक, मराठा आरक्षण जाहीर करुन मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने केले आहे. दरम्यान, राज्यमागासवर्ग न्या. गायकवाड आयोग रद्द करावा, ओबीसी, विजेएनटी समाजाला दिलेल्या संविधानिक आरक्षणाचे संरक्षण करण्यात यावे, मंडल आयोगाची 100 टक्के अंमलबजावणी करण्यात यावी, दादा इदाते आयोगाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी, ओबीसी, विजेएनटी समाजासाठी लोकसंख्येनुसार स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात यावी, ओबीसी, विजेएनटी समाजासाठी ग्रामपंचायत ते संसदेपर्यंत राजकीय आरक्षण देण्यात यावे, 2021 साली जातनिहाय जनगणना करावी, बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, शिक्षण मोफत द्यावे, सुशिक्षित बेरोजगार व कोकणातील बेदखल कुळांचा प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवावा, राज्य सरकारच्या सेवेतील ओबीसी, विजेएनटीचा 50 हजारांचा मेगाबॅकलॉग त्वरित भरण्यात यावा, आदी मागण्या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहेत.