चारित्र्यवान मुलं घडवाःवसंत हंकारे

मार्गदर्शन करताना वसंत हंकारे व्यासपीठावर धनंजय पवार, सचिन रणवरे व इतर (छाया: निलेश सोनवलकर)

तिरकवाडीत गणेश फेस्टिव्हल उत्साहात

दुधेबावीः आई - वडिलांनी आपल्या आयुष्यात सत्ता संपत्ती कमावण्यापेक्षा आपली मुलं चारित्र्यवान घडवा तरच तुमचं जीवन सार्थकी लागेल असे आवाहन प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी केले.

जय हनुमान क्रीडा मंडळ तिरकवाडी आयोजित गणेश फेस्टिव्हल मध्ये ‘चला माणूस घडवूया’ या विषयावर हंकारे बोलत होते. अध्यक्षस्थानी फलटण तालुका दुध संघाचे अध्यक्ष धनंजय पवार होते. यावेळी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र भणगे, आनंदराव सोनवलकर, मोहनराव डांगे, निवेदक नवनाथ सोनवलकर, रवींद्र ठावरे, राजेंद्र खरात, फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश सोनवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

हंकारे म्हणाले, आज समाजात अनेक तरुण मंडळी चूकीचे वागताना दिसत आहेत. त्यांना चांगले माणूस घडवण्याचे, चांगले संस्कार करण्याचे काम आई वडीलांचे आहे . दुसरे काही जमले नाही तरी चालेल परंतु मुल घडवण्याचे काम पालकांनी केले पाहिजे. आज अनेक वृध्दाश्रमात मातापिता दुखात जीवन जगत आहेत. संस्कार हा विषय खूप महत्वाचा आहे. शाळेमध्ये असणार्‍या पालक मिटींगला पालकांनी उपस्थित राहिले पाहिजे.आयुष्यात खूप धमाल आहे. फक्त आपण जगायला शिकले पाहिजे. जीवनामध्ये आत्मविश्‍वास महत्त्वाचा आहे.चांगल्या कर्तृत्वाचे व्यसन असले पाहिजे की ज्यामुळे आई वडीलांची मान उंचावली पाहिजे. आईचा आशीर्वाद कायम पाठीशी असला पाहिजे. तुम्हाला कधीही काही कमी पडणार नाही. जग जवळ आले पण माणस दूर जाऊ लागली आहेत.

अध्यक्षीय भाषणात धनंजय पवार म्हणाले, तिरकवाडीच्या जय हनुमान क्रीडा मंडळाचे फेस्टिव्हलचे हे 21 वे सलग वर्षे असून असे उपक्रम सुरू ठेवणे कठीण काम आहे. तिरकवाडीच्या या उपक्रमाचे मी कौतुक करतो. अनेक ठिकाणी व्याख्यान माला मानसन्माना मुळे बंद पडलेल्या आहेत. गणेश फेस्टिव्हलला माझ्या शुभेच्छा .यावेळी श्रीधर कदम, निलेश काळूखे, नानासाहेब काळूखे,दत्ता कदम, हणुमंत सोनवलकर, यांच्या सह ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.