Your Own Digital Platform

भारतीय संघ घोषित, राहुलला संधी, मयांक मार्कंडेयचं पदार्पण

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. दोन टी-20 आणि पाच एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 फेब्रुवारीपासून दोन टी-20 आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरू होणार्‍या विश्वचषकाआधी ही भारताची अखेरची स्पर्धा असणार आहे.

भारतीय संघामध्ये बुमराह आणि कर्णधार विराट कोहलीचे पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अपयशी ठरलेल्या के.एल राहुलला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. तर फिरकीपटू रविंद्र जाडेजा, खलील अहमद, सिराज यांना डच्चू देण्यात आला आहे. उमेश यादव आणि सिद्धार्थ कौल यांना संधी देण्यात आली आहे. एकदिवसीय सामन्यातून दिनेश कार्तिकला वगळण्यात आले आहे. विजय शंकर आणि पंतला टी-20 आणि एकदविसीय सामन्यात संधी दिली आहे. दोन टी-20 सामन्यासाठी मयांक मार्कंडेय या नवोदित खेळाडूला संधी देण्यात आली आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वरला आराम देण्यात आला आहे.

लेग स्पिनर मयांक मार्कंडेयचं संघात पदार्पण

पंजाब आणि मुंबई इंडियन्सचा उदयोन्मुख लेग स्पिनर मयांक मार्कंडेनं भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीच्या संघात पदार्पण केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्‍यात दौर्‍यातल्या दोन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. इंग्लंड लायन्स संघाविरुद्धच्या अनधिकृत कसोटीत मयांक मार्कंडे हाच भारत अ संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यानं दुसर्‍या डावात पाच विकेट्स घेऊन भारत अ संघाला एक डाव आणि 68 धावांनी विजय मिळवून दिला. त्यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन ट्वेन्टी 20 सामन्यांमध्ये यजुवेंद्र चहलच्या साथीनं मयांक मार्कंडेय हा भारतीय संघातला दुसरा लेग स्पिनर असेल.

लोकेश राहुलनं संघात पुनरागमन

कर्नाटकचा सलामीचा फलंदाज लोकेश राहुलनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारताच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठीच्या संघात पुनरागमन केलं आहे. कॉफी विथ करण कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळं हार्दिक पंड्या आणि राहुलला ऑस्ट्रेलिया दौर्‍यातून माघारी पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर हार्दिक पंड्यानं न्यूझीलंड दौर्‍यातल्या वन डे सामन्यांमध्ये पुनरागमन साजरं केलं. पण राहुलच्या गाठीशी ऑस्ट्रेलिया दौर्‍यातलं अपयश असल्यानं त्याला भारत अ संघातून खेळवण्यात आलं. त्यानं लागोपाठ दोन अनधिकृत कसोटी सामन्यांमध्ये बजावलेल्या कामगिरीनं निवड समितीचं लक्ष वेधून घेतलं. याच कामगिरीनं राहुलला भारताच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी संघांमध्ये स्थान मिळवून दिलं आहे.

टीम इंडियाचा दुसरा यष्टिरक्षक रिषभ पंत असण्याची चिन्हं

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्‍यातल्या पाच वन डे सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या सामन्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघांमधून दिनेश कार्तिकला वगळण्यात आलं आहे. इंग्लंडमधील आगामी विश्वचषकासाठी महेंद्रसिंग धोनीच्या साथीनं टीम इंडियाचा दुसरा यष्टिरक्षक रिषभ पंत असण्याची चिन्हं दिसू लागली आहे. पहिल्या दोन वन डे सामन्यांसाठी आणि त्यानंतरच्या तीन वन डे सामन्यांसाठी असे संघ जाहीर करण्यात आले आहेत. या दोन्ही संघांमध्ये अनुभवी महेंद्रसिंग धोनी आणि युवा रिषभ पंत या दोनच यष्टिरक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ इंग्लंडमधल्या आगामी विश्वचषकासाठी दुसरा यष्टिरक्षक म्हणून पंतच्या नावाला झुकतं माप मिळण्याची अधिक शक्यता आहे.

दोन टी-20 साठी भारतीय संघ

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, शिखर धवन, पंत, कार्तिक, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, बुमराह, शामी, चहल, विजय शंकर, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयांक मार्केंडेय