Your Own Digital Platform

तुला पाहते रे : विक्रांत सरंजामेची खेळी त्याच्यावरच उलटणार?

नवनवीन ट्विस्ट आणि कथानकातील वैविध्य यामुळे झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका खूप गाजतेय. मालिकेत विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांच्या लग्नानंतर नवीन ट्विस्ट आल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढली आहे. मालिकेत आता लवकरच आणखी एक मोठी घडामोड पाहायला मिळणार आहे.

विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आला आहे. विक्रांतचे इशावर प्रेम नसून त्याने प्रॉपर्टी बळकावण्यासाठी इशाशी लग्न केल्याचे समोर येते. तो झेंडेंना सर्व प्लान समजावून सांगताना दिसतो. विक्रांतच्या नव्या प्लाननुसार तो सरंजामे कुटुंबाला इशा हीच राजनंदिनी असल्याचं भासविणार आहे. इशाच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे असं विक्रांत सरंजामे कुटुंबीयांना पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. घरातल्यांचा त्यावर विश्वास बसल्यानंतर आईसाहेब त्यांची सर्व संपत्ती इशाच्या नावावर करतील आणि मग इशा विक्रांत सरांच्या नावावर संपत्ती करेल, असा कट विक्रांतने आखला आहे. मात्र विक्रांतची ही खेळी त्याच्यावरच उलटण्याची शक्यता आहे.

जेव्हा विक्रांत इशाला राजनंदिनीच्या भूतकाळातील गोष्टींची आठवण करून देईल, तेव्हा इशाला राजनंदिनीचं आयुष्य आठवेल आणि विक्रांतने तिचा कशाप्रकारे छळ केला हे कळेल. राजनंदिनीच्या मृत्यूस विक्रांतच जबाबदार असल्याचं तिला समजेल आणि विक्रांतला चांगलाच धडा शिकवण्याचा निर्णय घेईल.