Your Own Digital Platform

ब्लड बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. बिपीन शहा सातव्यांदा बिनविरोध

फलटण: फलटण मेडिकल फौंडेशनच्या (रक्तपेढी) अध्यक्षपदी डॉ. बिपीन शहा यांची सलग सातव्यांदा फेर निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचे विविधस्तरावरुन अभिनंदन होत आहे.

फलटण मेडिकल फौंडेशनची (रक्तपेढी) वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली त्यामध्ये सन 2019 ते 2022 या 3 वर्षासाठी नवीन पदाधिकारी व कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली त्यामध्ये डॉ. बिपीन शहा यांची अध्यक्षपदी सलग सातव्यांदा बिनविरोध फेर निवड करण्यात आली.

फलटण शहर व तालुक्यात कृषी व औद्योगिक विकासाला गती प्राप्त होत असताना वाढत्या लोकवस्तीला पुरेशा वैद्यकिय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी वैद्यक शास्त्रातील अत्याधुनिक साधने सुविधांनी सुसज्ज रुग्णालयांची संख्या वाढत असताना सामाजिक बांधीलकी, वैद्यक शास्त्रात काळाची गरज आणि रुग्णांची निकड याचा योग्य ताळमेळ घालुन फलटण, माण, खटाव, खंडाळा तालुके नातेपुते ता. माळशिरस या ठिकाणच्या सुमारे 100 डॉक्टर्सनी एकत्र येवून फलटण मेडिकल फौंडेशनची स्थापना आणि त्याद्वारे रक्तपेढीची निर्मिती करुन गेली 25 वर्षे सदर रक्तपेढी ना नफा, ना तोटा तत्वावर 24 तास अखंड सेवा, अपुलकीची वागणूक, काटकसर, स्वच्छ प्रशासन, पारदर्शी व्यवहार, शिस्तबध्द नियोजन थालीसिमीया रुग्णांना मोफत ब्लड बॅग तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी आर्थिक सवलत, दारिद्रय रेषेखालील रुग्णांना जीवनदायी रक्तदान योजनेंतर्गत मोफत ब्लड बॅग, रक्तदान, एड्स, व्यसनमुक्ती, मोफत ब्लड बॅग याबाबत प्रबोधनात्मक कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन विविध साथीच्या आजाराबाबत प्रबोधन, आरोग्य प्रदर्शन सर्वांगीण योग कार्यशाळा, रक्तदात्यांचा मेळावा, रक्तदान शिबीरांचे आयोजन तसेच रक्तदात्यांचा सन्मान आदी उपक्रम या माध्यमातून राबविण्यात येत असतात.

आतापर्यंतच्या कालावधीत जवळपास 75 ते 80 हजार रक्क पिशव्या वितरित करण्यात आल्या वेगळ्या अर्थाने एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णांना जीवनदान देण्यात फौंडेशनने हातभार लावला आहे.

आधुनिक वैद्यक शास्त्राप्रमाणे याही संस्थेला अपग्रेडेशन अनिवार्य आहे, रक्ताची मागणी व पुरवठा याचे प्रमाण व्यस्त राहिले, शिवाय रक्तजन्य व्याधी पसरण्याचे प्रमाणही वाढू लागले असल्याचे जागतिक संशोधनानुसार आढळले असून उपचार करताना दात्याकडून घेतलेले रक्त जसेच्या तसे रुग्णाला देण्या ऐवजी रुग्णाला ज्या रक्त घटकाची गरज आहे तोच घटक देण्याचा शास्त्रीय विचार पुढे आला यातूनच कंपोनंट थेरपी व कंपोनंट लॅबचा उदय झाला आहे. फलटण मेडिकल फौंडेशनची (रक्त पेढी) त्या मार्गाने वाटचाल सुरु झाली असून सुमारे 65 ते 70 लाख रुपये खर्च करुन हे युनिट सुरु करण्याचा आणि काही महिन्यात ही सेवा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.

कंपोनंट लॅब सुरु झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे कोणत्याही रुग्णाला केंव्हाही, कधीही हमखास रक्त उपलब्ध होईल यासाठी विविध संस्था, सामाजिक, राजकिय, शैक्षणिक क्षेत्रातील दानशुरु व्यक्तींनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी तसेच जास्तीत जास्त रक्तदान शिबीरे भरविण्यास सहकार्य करावे असे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. बिपीन शहा यांनी केले आहे.

फलटण मेडिकल फौंडेशन सन 2019 ते 2022 या 3 वर्षासाठी सर्वसाधारण सभेत एकमताने पुढील प्रमाणे नवीन कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली आहे. अध्यक्ष- डॉ. बिपीन शहा, उपाध्यक्ष- डॉ. श्रीकांत करवा, सेक्रेटरी- डॉ. संतोष गांधी, खजिनदार- डॉ. दत्तात्रय देशपांडे, संचालक- डॉ. सुभाष दोशी, डॉ. सौ. तेजस्विता देशपांडे, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. सौ. सुनिता पोळ, डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य उर्फ गुंगा, डॉ. संजय राऊत. स्विकृत संचालक- डॉ.रविंद्र जगताप, डॉ. जे.टी. पोळ, डॉ. ऋषीकेश राजवैद्य, डॉ. सुरेश शहा.