Your Own Digital Platform

अखेर ज्येष्ठ पत्रकारांच्या अर्थसहाय्य योजनेला शासनाची मान्यता; महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या पाठपुराव्याला यश


फलटण : गेल्या 30 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर शासकीय अधिस्वीकृती धारक ज्येष्ठ पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. याबाबत राज्यशासनाचे आभार मानून या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी जिल्ह्याजिल्ह्यातून शासकीय अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकारांनी आपापल्या जिल्हा माहिती अधिकार्‍यांमार्फत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन केले आहे. सदर सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या पात्रतेसाठी असलेल्या निकषांबद्दल समाधान व्यक्त करुन, या योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिमहा रुपये दहा हजार निवृत्ती वेतन शासनाने जाहीर करावे. अन्यथा यासाठी पुन्हा पत्रकारांना लढा उभारावा लागेल, असा इशाराही बेडकिहाळ यांनी दिला आहे.

पत्रकारांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी या योजने’च्या विश्‍वस्त मंडळामार्फत ज्येष्ठ पत्रकारांसाठी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना’ राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काल दि.2 फेब्रुवारी 2019 रोजी शासन निर्णय क्र.मावज-2013/प्र.क्र.195/का.34 अन्वये प्रशासकीय मान्यता दिली.

याबाबत बोलताना बेडकिहाळ पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील वयाची 60 वर्षे पूर्ण झालेल्या शासकीय अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा रुपये 10 हजार निवृत्तीवेतन स्वरुपात मिळावेत व या निवृत्ती वेतन योजनेला मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे यासाठी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीकडून गेली 30 वर्षे सातत्याने शासनात पाठपुरावा सुरु होता. बृहन्महाराष्ट्र जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ आणि अन्य समविचारी पत्रकार संघटनांच्या माध्यमातूनही याचा पाठपुरावा चालू होता. महाराष्ट्र राज्य प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांनीही यात विशेष लक्ष घालून राज्यसमितीत यासाठी विशेष ठरावही केला होता. ज्येष्ठ संपादक कृष्णा शेवडीकर, रमेश खोत, आर.वाय.जाबा यांच्या समवेत गेल्या 4 वर्षापासून मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रश्‍नाचा पाठपुरावा करण्यात येत होता. मुख्यमंत्री सुरुवातीपासूनच या योजनेबद्दल सकारात्मक होते. नुकतीच दि.3 जानेवारी 2019 रोजी शिरवळ, जि.सातारा येथे आम्ही मुख्यमंत्र्यांची समक्ष भेट घेवून सदरची योजना तात्काळ कार्यान्वित करावी अशी विनंती त्यांच्याकडे केली होती. त्यावर शासकीय अधिस्विकृतीधारक ज्येष्ठ पत्रकारांना ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजने’तून लवकरच निश्‍चितपणे अर्थसहाय्य सुरु केले जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले होते. त्यानुसार आता या योजनेचा प्रत्यक्ष लाभ राज्यातील अनेक वयोवृद्ध पत्रकारांना मिळणार आहे. संस्थेने पत्रकारांच्या कल्याणासाठी हाती घेतलेले आणखी एक काम यशस्वी झाले असल्याचा अभिमान वाटतो, असेही बेडकिहाळ यांनी सांगीतले.