Your Own Digital Platform

फलटणला युतीची भिती नाही


फलटण : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना व भारतीय जनता पार्टीने नुकतीच युतीची घोषणा केली आहे. मात्र, या युतीचा परिणाम फलटण तालुक्यात जाणवणार नसल्याची स्थिती आहे. शिवसेना म्हणून पक्षाला मानणारा काही मतदार तालुक्यात असला तरी या मतदारांचा फारसा प्रभाव दिसून येणार नाही. भारतीय जनता पक्षातील फलटण तालुक्यातील अंतर्गत वादविवाद हे सत्ताधार्‍यांच्या पथ्यावर पडणार असल्याचे दिसून येते आहे. त्याचबरोबर सह्याद्री कदम हे चिमणरावांच्या पक्षीय एकनिष्ठतेचा वारसा चालवणार की शरद पवारांना चिमणरावांनी केलेली मदत आठवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
युतीची भिती नसल्याने पवार सेफ
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघ हा माढा लोकसभा मतदार संघात येतो. माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे सुप्रिमो खासदार शरद पवार हे निवडणूक लढवण्याच्या मूडमध्ये सध्यातरी दिसत आहेत. लोकसभा मतदार संघाच्या पुर्नरचनेनंतर माढा हा नवा मतदार संघ तयार झाला. यात फलटण, माण, खटाव, सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा व पंढरपूर तालुक्यातील काही गावांचा समावेश होतो. मतदार संघाच्या पुर्नरचनंतर शरद पवार स्वत: येथून निवडून गेले होते. त्यानंतर मोदी लाटेतही माढा मतदार संघ राष्ट्रवादीकडेच राहिला. मोदी लाटेत खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे माढा मतदार संघातून निवडून आले. माढ्याच्या शेजारीच असलेल्या सोलापूर लोकसभा मतदार संघात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मोदी लाटेमुळे हार पत्करावी लागली होती. मात्र, सोलापूर जिल्ह्यातीलच बहुतांश तालुके असणार्‍या माढा मतदार संघाने पवारांना साथ दिली होती. आता, मोदी लाट फारशी राहीलेली दिसत नाही त्यामुळेच व युतीची भिती वाटत नसल्यानेच पवारांना हा मतदार संघ सेफ वाटत असावा.
पवारांच्या उमेदवारीने
भाजपाचे सह्याद्री पेचात पडणार
फलटण तालुक्यात भारतीय जनता पार्टीची अवस्था पाहिल्यास तालुक्यातील जुने कार्यकर्ते व पक्षांतर करुन आलेले नवे कार्यकर्ते यांच्यात मेळ दिसत नाही. त्याचबरोबर भाजपाचे सुशांत निंबाळकर व सह्याद्री कदम यांच्यातील सख्यही अनेकांना माहित जाहे. सह्याद्री कदम यांना चिमणराव कदमांचे वारसदार म्हणून मानले जाते. चिमणराव कदमांनी गतवेळेस शरद पवारांना मदत केली होती. यावेळेस चिमणरावांचा वारसा सह्याद्री चालवणार का? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. अर्थात चिमणराव कदम हयात असेपर्यंत त्यांचा सर्व गट राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिला. सह्याद्री कदमांनी मात्र चिमणरावांच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी असलेली एकनिष्ठता मोडून काढत भारतीय जनता पार्टीत जाणे पसंद केले. मात्र, शरद पवार यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवल्यास सह्याद्री कदमांपुढे मोठा पेच उभा राहणार आहे. वडिलांनी दाखवलेला पक्षाच्या एकनिष्ठतेचा अवलंब करायचा की वडिलांनीच शरद पवारांना केलेली मदत आठवायची, याचे कोडे सह्याद्री कदमांना निश्चितच पडले असणार, असे सांगितले जाते.
शिवसेनेचा प्रभाव
युती झाल्यास शिवसेनेसाठी हा विधानसभा मतदार संघ नेहमीच राखीव असतो. शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांनी या मतदार संघातून आमदारकीची निवडणुक लढवली होती. त्याचबरोबर उद्योगपती नंदकुमार तासगावकरांनीही या मतदार संघातून आमदारकी लढवली होती. यामुळे शिवसेनेकडे वळलेला मतदार येथे दिसून येतो. शिवसेनेने प्रभावी झालेला मतदार या मतदार संघात असल्याने व वेळोवेळी विविध आंदोलने व उपोषणे करुन स्थानिक शिवसैनिकांनी सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे या मतदार संघात शिवसेनेने प्रभावित झालेला मतदार दिसून येतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सातारा जिल्हा एकहाती ताब्यात देणारे ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणारा हा मतदार संघ आहे. राखीव प्रवर्गासाठी हा विधानसभा मतदार संघ आरक्षित असला तरीही ना. श्रीमंत रामराजेंनी दिलेलाच उमेदवार या विधानसभा मतदार संघातून निवडून येतो. ना. श्रीमंत रामराजेंनी यांनी केलेल्या सिंचनाच्या व औद्योगिक वसाहतींच्या भरिव कामांमुळे फलटण तालुका हा त्यांच्यावर प्रेम करतो आहे. ना. श्रीमंत रामराजेंच्या तोडीस तोड एकही पर्याय देणे भाजपा व शिवसेनेला जमणार नाही, हे उघड सत्य आहे. म्हणूनच फलटणला युतीची फारशी भिती वाटणार नाही.