Your Own Digital Platform

जिल्हा परिषद आघाडीवर राहण्यासाठी एकत्र येवून काम करणे गरजेचे: संजीवराजे
स्थैर्य, सातारा : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2018 अंतर्गत जिल्ह्याचा देशपातळीवर पहिला क्रमांक आणि त्याबद्दल त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार प्रातिनिधीक स्वरुपात आम्ही स्विकारला मात्र तो पुरस्कार ग्रामीण भागातील काम करणार्‍या अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचाय सदस्यांचा तसेच सर्वसामान्य नागरिकांचा आहे. आता जबाबदारी वाढली आहे. सातारा जिल्हा परिषद अनेक क्षेत्रा आघाडीवर आहे, ती यापुढेही आघाडीवरच राहील मात्र, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.

येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर पुणे विभागीय व जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन दख्खन व मानिनी जत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे बोलत होते.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कृषी सभापती मनोज पवार, बाल कल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, समाज कल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे आदी उपस्थित होते.

श्रीमंत संजीवराजे म्हणाले, आपला जिल्हा स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात पहिला आला आहे. यामुळे इतर जिल्ह्यातून लोक आपला जिल्हा पाहण्यासाठी येत आहेत यासाठी शाश्वत सातत्य ठेवले पाहिजे. घनकचरा व सांडपणी व्यवस्थापनासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेला 17 ते 18 कोटी मिळणार आहेत. स्वच्छतेच्या कामासाठी निधीची कमतारता पडू दिली जाणार नाही. स्वच्छतेबाबत जनजागृती करुन स्वच्छता ही आपली संस्कृती बनली पाहिजे.

कैलास शिंदे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, घरकुल यावर लक्ष केंद्री केले आहे. स्वच्छतेच्या कामात ग्रामपंचायतस्तरावर चांगले यश मिळाले आहे. यापुढे आता घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरु आहे. घनकचर्‍यापासून 158 टन गांडूळ खत तयार केले आहे. यातून ग्रामपंचायतींना उत्पन्न मिळत आहे. आता सर्वांनी सांडपाणी व्यवस्थापनासाठी पुढे यावे. सांडपाणी व्यवस्थापनासाठी राज्य शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा सुरु आहे. यातून भूमिगत गटारे बांधण्यात येणार आहेत. तसेच 50 टक्के अनुदानावर प्लास्टीक निर्मुलन यंत्र बसविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी दिली.

उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, विविध गावच्या सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

दरम्यान, आज स्वच्छ सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट काम करणार्‍या पंचायत समित्या, पत्रकार, ग्रामसेवक, ग्रामपंचायती, अंगणवाडी सेविका, आशा यांचा सत्कार आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पुलवामा येथे शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी केले. यावेळी विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.