Your Own Digital Platform

दिगंबर आगवणेंची भुमिका महत्वाची
स्थैर्य, फलटण:
माढा लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. आता, तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोट बांधून माढा लोकसभा मतदार संघात ती कशी फिरवता येईल, याकडे रणजितसिंहांना लक्ष द्यावे लागणार आहे. कार्यकर्त्यांच्या गराड्यात फलटण-कोरेगाव विधानसभेचे गतवेळेसचे उमेदवार दिगंबर आगवणे यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे.

स्वराज संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे निकटवर्तीय समजल्या जाणार्‍या दिगंबर आगवणे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्यावर अन्याय होत आहे, असे म्हणत आपली वेगळी चुल टाकली. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसच्या कचाट्यात नेहमीच अडकत गेेलेल्या आगवणे यांना रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी चांगलीच साथ दिली. मध्यंतरी आगवणे यांचे उपोषण बरेच गाजले. या उपोषणात रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आगवणे यांची प्रकृती पाहून अनेकदा भावनिक झाले, याचे दाखले वेळोवेळी कार्यकर्ते देतात. मात्र, आगवणे यांनी आपला बाणा कायम ठेवत उपोषण हाय-व्होल्टेज लेव्हलपर्यंत नेले. तेंव्हापासून आगवणे व रणजितसिंह यांच्यात थोडाफार दुरावा दिसू लागला.

आता, भारतीय जनता पार्टीची खासदारकीची उमेदवारी रणजितसिंहांना मिळाल्यानंतर आगवणे काय करणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले आहे. आगवणे निश्चितच सकारात्मक भुमिका घेतील, असे सांगण्यात येत आहे. तालुक्यात आगवणे यांचा वैयक्तिक गट आहे. तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणार्‍या गिरवी ग्रामपंचायतीवर त्यांचे काही काळ वर्चस्व होते. दूधेबावी परिसरातही त्यांनी आपले पाय चांगलेेच पसरलेले आहेत. ग्रामीण भागात व शहरात काही प्रमाणावर आगवणे यांनी स्वत:चा गट तयार केला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या गटाचा निश्चितच फायदा होणार आहे.

याबाबत दिगंबर आगवणे यांना विचारले असता, रणजितसिंह नाईक निंबाळकरांसमवेत आपली सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच निर्णय आम्ही जाहीर करु, असे आगवणे यांनी स्पष्ट केले.