Your Own Digital Platform

सातारच्या राजकारणाची मिसळ, दहिवडा की खिचडी होणार?


विजय मांडके, सातारा

सातारचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपाच्या नरेंद्र पाटील यांचे बरोबर मिसळ खावून गप्प बसणार की राजकारणाची भेळमिसळ करणार? लोकसभा विधानसभेला हि मिसळ वडा खिचडी होऊ शकते याचबरोबर खासदार उदयनराजे भोसले हे राजकारणात कोणाचाही वडा आणि त्यातल्यात्यात दहिवडा करण्यात तरबेज आहेत. त्यामुळे सध्या मिसळ , भेळ , दहिवडा आणि शेवटी खिचडी राजकारण सातारच्या राजकीय पटलावर सुरू आहे.
सातारचे राजकारण राजघराण्यातील दोघांभोवती सध्याच नाही तर गेली काही वर्षे फिरत असल्याची चर्चा तरी सुरू आहे. काहीही करुन आपणच चर्चेत रहायचे असे या दोघांनी मिळून ठरवलेले दिसतंय. खासदार व आमदार दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे. पण दोघेही पक्षापेक्षा आपला गट , गड मजबूत ठेवतात. खासदार उदयनराजे भोसले तर नेहमी म्हणतात की पक्षापेक्षा मला जनता महत्वाची वाटते. सर्व पक्षाची तिकिटे माझ्या खिशात आहेत. आहे की नाही मजा. खासदार उदयनराजे भोसले हे कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या कार्यक्रमाला बोलवतात तर तेच कधी तरी फडणवीस यांची भेट घेवुन कमराबंद चर्चा करतात. कधी रिपाइं चे रामदास आठवले यांच्या बरोबर चर्चा करून चर्चेत राहतात.
त्यावर आता आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी जर तसेच राहुन चर्चेत राहाण्याचे ठरवले असले तर तुम्ही आम्ही काय करू शकतो. आता हेच पहाना सातारा येथील चंद्रविलास हॉटेल. हे आहे वसंतशेठ जोशी यांचे. वसंतशेठ जोशी हे खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते. त्यांना उदयनराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडी च्या माध्यमातून सातारा नगरपालिका शिक्षण मंडळावर सदस्य , सभापती म्हणून संधी दिली. ते कापले तोडले तरी दुसरया गटात जाणार नाहीत . त्यांच्या हॉटेल मध्ये सातत्याने खा. उदयनराजे भोसले समर्थकांची उठबस असते. या हॉटेल मध्ये आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपा चे नेते आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील यांना घेवुन मिसळ खाण्यासाठी जातात. त्यांचेसमवेत भाजपा नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अनिल देसाई सुध्दा असतात ही गोष्ट मिसळ खाणे पुरती मर्यादित नसावी. सध्या आमदार महोदयांनी सुध्दा उदयनराजे भोसले यांच्या पावलावरपाउल टाकुन राजकारणात गंमत करायचे ठरवलेले दिसत आहे. चर्चेत राहण्यासाठी हा सारा खटाटोप. आता हेच पाहाना आमदार म्हणतात की मला भाजपा- शिवसेनावाले त्यांच्या पक्षात बोलवत आहेत. हे सांगुन त्यांनी चर्चेला दिला मुद्दा सोडून. सातारची ही राजकीय मिसळ मनोमिलनाकडे चाललेली दिसतेय. कारण खासदार व आमदार दोघेही आपल्याभोवती चर्चा सुरू ठेवण्याची एकही संधी सोडत नाहीत.
हुंदे चर्चा.....
सातारा शहरातील रस्त्यावरुन , रस्त्यातील खड्यावरुन वर्षानुवर्षे जाणारी सातारची रयत राजांना प्रश्न न विचारता दोन्ही राजांच्या या करामतीकडे करमणूक म्हणुन पाहण्यातच स्वत:ला धन्य धन्य झाल्याचे मानते. त्यांनी कॉलर उडवली , ते बघुन हसले , ते म्हणाले पक्ष गेला खड्यात , आमचे राजे लाखात एक आहेत. दोघे एका कार्यक्रमात होते पण बोलले नाहीत. उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजेंकडे बघून स्मीत हास्य केले , त्यांनी त्यांचा खांदा दाबल्यावर बाबाराजे म्हणाले मजबूत आहे यावर चर्चा करण्यात सातारकरांना जादा रस . विकास कामांसंदर्भात बोलायच झालं तर हाती काय येत हे सारयांना माहिती आहेच. सातारचे मेडिकल कॉलेजचा न सुटलेला प्रश्न. सातारा शहराच्या हद्दवाढ प्रश्नावर फक्त निवडणूक आली की होणारी चर्चा . प्रकल्पग्रस्तांचे न सुटलेले प्रश्न , शेतकरी , शेतमजूर यांचे प्रश्न , अपुर्ण सिंचनप्रकल्प , वाढती बेरोजगारी , सातारा औद्योगिक वसाहतीची दुर्दशा यावर मात्र बोलताना जरा आखडता पाय घेतला जातो हे नक्की. हे सारं बघितले की सातारच्या राजकारणात भेळ , मिसळ , दहिवडा , खिचडी काहिही होवू शकते. हेच खरे.