Your Own Digital Platform

जनतेने नाकारलेल्या कासुर्डेंचा मागच्या दाराने येण्याचा प्रयत्न
नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकरांचे प्रतिउत्तर

स्थैर्य, पाचगणी : जनतेने दोन वेळा नाकारलेल्या नानासाहेब कासुर्डे यांनी आमदारांशी सेटिंग करून मागील दाराने पाचगणी पालिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तुमचे पुतणे अन् त्यांचे मेव्हणे या दोघांच्या मतांची बेरीज पण माझ्या मतांएवढी नाही. त्यामुळे ज्यांची लायकीच नाही त्यांनी आम्हाला आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नये, असा घणाघात नगराध्यक्ष लक्ष्मी कर्‍हाडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

स्वीकृत नगरसेवक निवडीवरून विरोधी गटाने नगराध्यक्षांवर विविध आरोप केले होते त्याचा समाचार घेण्यासाठी नगराध्यक्षांनी या पत्रकार परिषसदेचे आयोजन केले होते.

त्या पुढे म्हणाल्या, मला माझे काम,कर्तृत्व सिद्ध करण्याची गरज नाही.कारण,लोकांनी मला दोन वेळा थेट निवडून दिले आहे.2016 मध्ये मी झालेल्या मतदानाच्या निम्म्यापेक्षा जास्त मते मिळवली आहेत.महिला आरक्षणातून नव्हे तर ’ओपन’ मधून मी लढून विजयी झाली आहे.त्यामुळे ज्यांना वॉर्डातून लढताना शे दीडशे मत मिळवून विजयी होता येत नाही त्यांना अन आम्ही घाबरू?हा तर यावर्षीचा सर्वात मोठा ’जोक’ असल्याची खिल्ली उडवत सौ.कर्‍हाडकर पुढे म्हणाल्या,थेट नगराध्यक्षांना स्वीकृत नगरसेवक निवडीचे अधिकार देण्यात आल्याच्या उपलब्ध माहितीवरून आम्ही या प्रक्रियेला आव्हान दिले.तो आमचा अधिकार आहे.अन चौघांचे अर्ज भरल्याचे काय नाचवता,त्यातील दोन उमेदवार नगरसेवक होणार अन तेही माझ्याच गटाचे असतील असा ठाम विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.ज्यांना सत्तेत असताना आपले सहकारी सांभाळता आले नाहीत,त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना कितीही फूस लावली तरी त्यांच्यावर काहीही फरक पडणार नाही.उलट तुमच्या जुन्या गमती जमती त्यांचे मनोरंजन मात्र नक्की होईल.

त्या पुढे म्हणाल्या,आमचे विरोधक ऐन तैन प्रकारे आम्हाला आपले अस्तिव दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यांची कुठेच डाळ शिजेना म्हणून त्यांनी आता नानासाहेबांकडे धाव घेतली आहे.गावाने नेतृत्व नाकारलेल्यांचे नेतृत्व विरोधकांनी स्वीकारावेे यावरून विरोधकांची राजकीय उंची दिसून येते.

नानासाहेबांची अडचण ही आहे की,ते जुन्या गोष्टी विसरतात. 2006 साली ज्यांनी आपला फुटबॉल केला होता,आता पुन्हा तेच नानासाहेबांना पुढे करत आहेत.त्यामुळे शह काटशहच्या गर्तेत अडकलेल्या या जेष्ठ नेत्याने मागच्या दाराने पालिकेत येण्यापेक्षा पाचगणीच्या पुढच्या निवडणुकीत समोरासमोर येऊन लढावे असे आव्हान देखील सौ.कर्‍हाडकर यांनी दिले.