Your Own Digital Platform

अनुप शहांनी दिले दोस्तीचे दाखलेस्थैर्य, फलटण: फलटणचे स्विकृत नगरसेवक अनुप शहा व भारतीय जनता पार्टीचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यातील ऋणानुबंध सर्वश्रूत आहेत. शहा व रणजितसिंह यांच्यातील दोस्ती लोकसभा निवडणुकीत दोघांना एकत्र येण्यास भाग पाडत आहे.

भारतीय जनता पार्टीत रणजितसिंहांचा प्रवेश होत असताना शहा यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. दरम्यान, ना. चंद्रकांत पाटील व सुभाष देशमुख यांनी शहासाहेब, आपण माढा जिंकणारच ना? असे विचारले. शहा यांच्याकडे असणार्‍या वक्तृत्व कौशल्याचा फायदा निश्चितच रणजितसिंहांना या निवडणुकीत होवू शकतो, असे मानले जाते.

फलटण नगरपालिकेच्या गतवेळेस झालेल्या निवडणुकीत शहा यांनी रणजितसिंहांच्या गटासमवेत फारकत घेतली होती. गटांतर्गत हेवेदावे वाढल्यामुळे शहा यांनी गटातून बाहेर पडण्याची भुमिका स्विकारली होती. त्यानंतर भाजपा व सध्या राष्ट्रवादीत असणार्‍या शहा यांना पुन्हा एकदा आपला जुना गट खुणावत आहे. लोकसभेसाठी शहा यांनीही कंबर कसली असून रणजितसिंहांनाबरोबरच जाण्याचा निर्धार शहा यांनी घेतलेला दिसत आहे. मी फलटणकर मोहिम राबवत आपल्या स्थानिक उमेदवारास मदत करा, असे शहा यांचे स्पष्ट म्हणणे आहे.