Your Own Digital Platform

स्टंट नाही डायरेक्ट अँक्शन : जिल्हा पोलिस प्रमुख सातपुते


सातारा,कराड,फलटण या ठीकाणावरील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत करणार

सातारा : स्टंट करणे हि माझ्या कामाची पद्धत नाही. गुन्हेगारीचा समुळ उच्छाटन करून सातारा शहराची ऐतिहासिक, शांत व समृद्ध परंपरा जपण्याचा माझा प्रयत्न असणार असल्याचा इरादा नुतन जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परीषदेत व्यक्त केला. यासाठी मला नागरीकांची ही साथ हवी असे आवाहनही त्यांनी सातारकरांना केले आहे.
गुन्हेगारी निर्मूलनासाठी बेसिक पोलिसिंग, वाहतुकीसाठी स्वयंशिस्त व गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करताना गुन्हेगारांना स्टंट नाही तर थेट हिसकाच दाखवणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

पुणे येथे गेल्या सहा महिन्यात आपण वाहतुकीच्या बेशीस्तीला लगाम घालताना , बेस्ट एफर्ट दिले आहेत. यामुळे अनेक सकारात्मक बदलही झाले आहेत. पुणे येथे ज्या आयडीया वापरल्या तो अनुभव म्हणून सातार्‍यासाठीही वापरला जाईल. अर्थात त्याबाबतचा आढावा घेवून काय काय करता येईल, हे ठरवले जाईल. पोलिस हे समाजातील प्रत्येक घटकासाठी आधार आहेत. सातारकर निश्चित पोलिसांसोबत राहतील, त्याचप्रमाणे एसपी म्हणून कर्मचार्‍यांच्या पाठीशी मी कायम ठामपणे असेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
त्या पुढे म्हणाल्या, जगात गुन्हेगारी नाही असे कुठेही नाही. मात्र सातार्‍यात गुन्हेगारी कमी कशी राहील व त्यावर जास्तीत जास्त प्रतिबंध कसा राहिल यावर आपला फोकस राहणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात असणार्‍या फलटण, कर्‍हाड, सातारा या तिन्ही गुन्हेगारी सेंटरवर लक्ष केंद्रीत करून बेसिक पोलिसींगवर भर दिला जाईल.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी गुंडाना कायद्याच्या कचाट्यात आणले जाईल. तडीपार असणार्‍यांच्या तडीपारीची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले जातील. जिल्ह्यात असलेल्या अवैध धंद्यांना त्या त्या ठिकाणच्या प्रभारींनी आळा न घातल्यास क्रॉस रेडमध्ये अवैध धंदे सापडल्यास त्याचे परिणाम प्रभारी अधिकार्‍यांना भोगावे लागतील. असा सज्जड दम त्यांनी जिल्ह्यातील कारभार्‍यांना दिला आहे.

जिल्ह्यात काम करणार्‍या यापुर्वीच्या एसपींना राजकीय दबावाचा सामना करावा लागल्याचे पत्रकरांनी सातपुते यांच्या निदर्शनास आणले. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या संविधानाला जे अभिप्रेत आहे तेच करण्याचा माझा प्रामाणीक प्रयत्न राहील.
माझ्या पोलीस दलात काम करणारा प्रत्येक कर्मचारी हे माझे कान,नाक अन् डोळे आहेत. त्यामुळे टीम स्पिरीटला जास्त महत्व दिले जाईल. कर्मचार्‍यांवर कोणाताही अन्याय केला जाणार नाही. तसेच जसा कर्मचार्‍यांना काम सांगण्याचा मला अधिकार आहे, तशीच त्यांच्या काळजीचीही जबाबदारी माझ्यावर असल्याने माझे कर्मचार्‍यांसोबतचे वर्तन एसपी म्हणून पालकासारखे राहील. असे जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.