Your Own Digital Platform

‘लेडी सिंघम’ तेजस्वी सातपुते

महिला दिन साजरे करण्याची कारणे उरायला नकोत; महिला दिनानिमित्त एक्सक्लुझिव्ह मुलाखत

ज्यादिवशी महिला दिन साजरी करण्याची कारणेच उरणार नाहीत. त्याचदिवशी खर्‍या अर्थाने महिलांचे स्थान या समाजात महत्वाचे ठरेल, असे मत सातारा जिल्ह्याच्या नुतन पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले. दैनिक स्थैर्यच्या विशेष प्रतिनीधी अनुश्री अमित फडके यांनी जागतिक महिला दिनानिमित्त सातपुते यांची घेतलेली खास मुलाखत...

प्रश्न: आपीएस होण्याचे स्वप्न कसे बघितले?

उत्तर: लहानपणी पायलट होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, चष्मा असल्याने आपण पायलट होवू शकणार नाही, असे त्यावेळी समजले. म्हणून इतर शिक्षण सुरु केले. खर तरं, पायलट व्हायच होत. पण, नंतर बायोटेक्नॉलीजीकडे वळले. पदवीचे शिक्षण सुरु असताना बेंगलोर येथे रिसर्च करण्याची संधी मिळाली. पदवीनंतर खरतर पीएचडी करतात. पण, त्याआधीच आपल्याला ही रिसर्चची संधी मिळाली. पण, त्यात मन रमल नाही. एमएसस्सी केलं नाही. म्हणून पुण्यात आले. पुण्यात एम. ए. साठीच्या सर्व जागा पूर्ण झाल्या होत्या. मात्र, पुण्यात आयएलएस लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळाली. ‘लॉ’ची प्रवेशिकाही शेवटच्या दिवशी भरली. आयएलएसमध्ये स्पर्धा परिक्षा देण्याकडे भर दिला. देशाचे भवितव्य घडवणारे निर्णय अधिकारी बनवण्याची संधी मिळाली. आयपीएस मी होईन, असे वाटलेच नव्हते. पण, आयपीएस झाल्यानंतर आनंद वाटला. फायटर पायलटच्या वर्दी ऐवजी खाकी वर्दीत आपण आल्याचे समाधान वाटले.

प्रश्न: समाज सुधारलेला आणि सुशिक्षीत असूनही महिलांवर अन्याय होताना दिसतात, त्यावेळी खाकी वर्दीतील संवेदनशील मनाला काय वाटते?

उत्तर: खूप वाईट वाटतं. दुर्दैवाने महिलांवरील अत्याचाराच प्रमाण खूप दिसत. आपण इथे बसतो तेंव्हा महिला मोकळेपणाने बोलतात. अन्याय कमी होण्यासाठी जास्तीत सुरक्षित वातातवरण तयार करत आहोत. यापूर्वी महिला स्वावलंबी नव्हत्या. आता, स्वावलंबी महिला झाल्या आहेत. मात्र, अजूनही समाज आपल्याविषयी काय बोलेल? या मानसिकतेत महिला दिसतात. या भितीमुळे व पिढ्यांपिढ्या झालेल्या संस्कारांचा प्रभाव त्यांच्यावर असावा, म्हणून हे घडतयं. महिलांनी अन्याय होत आहे, असे समजताच वाचा फोडली पाहिजे. तरच यावर उपाय करु शकतो.

प्रश्न: स्त्री-पुरुष समानतेविषयी आपले काय मत आहे?

उत्तर: महिलांना तुम्हीच खास आहात. पुरुषांच्या बरोबरीने चालण्यापेक्षा तुम्हीच चांगल्या आहात, हे समजवायला लागेल. आपण समान आहोत. आपल्यात कोणतीही कमी नाही. या भुमिकेत जेंव्हा त्या पोहोचतील. व त्यांच्यातील वैशिष्ट्याला त्या ओळखतील तेंव्हाच स्त्री पुरुष समानता हा विषय समाजातून नामशेष होईल. जोपर्यंत महिला पुढे जात नाहीत, तोपर्यंत महिला दिनासारखे दिन साजरे करणे गरजेचे आहे.

प्रश्न: तुमच्या जीवनातील प्रभावी महिला कोण? व तुमच्या मुलीला भावी वाटचालीसाठी काय सांगाल?

उत्तर: माझे आई-वडिल हेच माझे आदर्श आहेत. माझ्या मुलीला मी महिला म्हणून घडवत नाहीये. तिला माणूस म्हणून घडवतेय. त्यामूळे माझी मुलगी ही स्त्री म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनच या जगात वावरेल.

प्रश्न: महिलांना स्वरक्षणासाठी काय सांगाल?

उत्तर: पाककला, नृत्यकला जश्या शिकवल्या जातात तसेच कराटेही मुलींना शिकवावे. मुलींना मानसिक दृष्ट्याही सक्षम केले पाहिजे. जर बसमध्ये बसलेल्या म्हातार्‍यानेही वेगळ्या नजरेने मुलींकडे पाहिल्यास मुलींनी त्याबाबत आवाज उठवावा. आपल्या समवेत सेफ्टी पिन ठेवावी.

प्रश्न: एवढी मोठी जबाबदारी असताना गृहिणी म्हणून कशा असता?


उत्तर: सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी घरात प्रवेश केल्यानंतर व बूट काढल्यानंतर सर्व जबाबदारी विसरुन आपण एक गृहिणी आहोत, असेच वावरते. माझे कुटूंबही मला खूप मदत करते. माझी मुलगी, माझे पती, नातेवाईक नेहमीच माझ्या या कामाला पाठींबा देत असतात. नातेवाईक नाराज होत नाहीत. प्रत्येक जण आपआपल्या पातळीवर पाठींबा देत राहतात. माझी मुलगी सहा महिन्याची असताना एक महिना मावशी आली, आई आली, सासूबाई आल्या, नणंदबाई आल्या. व एक वर्षभर मी कामात असले तरीही सर्वांनी माझ्या मुलीला व त्या बाळाला सांभाळले. आमच्या नातेवाईकांमुळेच आज मी काम करत आहे.