Your Own Digital Platform

पारदर्शीची टिमकी वाजवणार्‍या लक्ष्मी कर्‍हाडकरांना माझी भिती
पाचगणीचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे यांचा आरोप

स्थैर्य, पाचगणी : गेल्या 25-30 वर्षांच्या कारकिर्दीत यशाने हुरळून गेलो नाही, की अपयशाने खचलो नाही. आता पालिकेत नाही म्हणून माझी घुसमट होत नसून अखेरच्या श्वासापर्यंत पाचगणीच्या भल्यासाठी कार्यरत राहण्याच्या भूमिकेतून स्वीकृत नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. स्वच्छ पारदर्शी कारभाराची टिमकी वाजविणार्‍या नगराध्यक्षांना माझी भिती वाटतेय, म्हणूनच त्यांनी न्यायालयात धाव घेतली, असा थेट आरोप करत सौ.कर्‍हाडकर यांची बनवाबनवी रोखण्यासाठीच मी सक्रिय झालो असल्याचा ठाम विश्वास माजी नगराध्यक्ष नानासाहेब कासुर्डे यांनी पत्रकार परिषेदेत व्यक्त केला.

स्वच्छ शहर म्हणून देशात स्वच्छतेचा डंका मिरवणार्‍या या पालिकेत मनमानी कारभार, भ्रष्टाचार, स्वच्छतेच्या नावाखाली सत्ताधारी गटाचा गोलमाल याबाबत विरोधक सातत्याने आवाज उठवत आहेत. ज्या पालिकेत नगराध्यक्ष, आघाडी अध्यक्ष म्हणून काम केले त्या पाचगणी पालिकेला पैसे कमविण्याचे साधन करण्याचे काम काहींनी सुरू केले आहे. या लोकांना धडा शिकवण्यासाठी विरोधी गट प्रयत्नशील आहे. त्यांना स्वतःहून माझ्याकडे येऊन पाचगणी शहराला या दुष्टचक्रातुन वाचविण्याची मागणी केली असल्याचेही कासुर्डे यांनी सांगीतले.

पालिकेची स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया लक्ष्मी कर्‍हाडकर यांनी जणीवपूर्वक थांबवली होती.संजय कासुर्डे यांच्या प्रयत्नाने ही निवडणूक लागली. तेव्हा विरोधी गटाने एकमताने माझ्या नावावर शिक्कामोर्तब केले. नगराध्यक्ष खरच पारदर्शी कारभार करत असतील तर त्यांना माझी एवढी भीती का वाटतेय? कर्‍हाडकर तुमच्या मनात काळबेर असल्यानेच तुम्ही या निवडीत बिब्बा घालण्याचे काम केले आहे. मी नगरसेवक होईन अथवा होणार नाही मात्र शेवटच्या श्वासापर्यंत पाचगणीच्या भल्यासाठी कार्यरत राहणार असून नाटकी, संधीसाधू समाज सेवकांना आमच्या कामाची माहिती कुठून येणार असा प्रश्न देखील कासुर्डे यांनी उपस्थित केला.

माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे म्हणाले, नगराध्यक्षांनी जाणीवपूर्वक स्वीकृत नगरसेवक निवडीला प्रेस्टीज इशू केला आहे.

माजी उपनगराध्यक्ष विनोद बिरामने म्हणाले, नानासाहेब यांच्याइतका नम्र आणि कर्तबगार माणूस आम्ही पाहिला नाही.पालिकेतील कचर्‍यात गोलमाल सुरू आहे. हे सर्व वेळीच थांबविले पाहिजे. ठेकेदारांना अभय देऊन इप्सित साध्य करू पाहणार्‍यांना अद्दल घडविण्यासाठीचा हा लढा आता आणखी व्यापकपणे लढणार असल्याचेही बिरामणे यांनी स्पष्ट केले.

नरेंद्र बिरामने म्हणाले, नगराध्यक्षांनी आपल्या गटातून चौघांना अर्ज भरायला लावून स्वतःच या प्रक्रियेवर ‘स्टे’ आणला आहे.आपल्या सहकार्‍यांना तोंडघशी पाडणार्‍यांना नानासाहेब कासुर्डे यांच्या नुसत्या अर्ज भरण्याने पायाखालची वाळू घसरली आहे.कर्‍हाडकर तुमचे काउन्ट डाऊन सुरू झाले असून नानासाहेबांच्या अनुभवासमोर तुमची बनवाबनवी टिकू शकणार नाही.

यावेळी नरेंद्र बिरामने, अनिल वन्ने, पृथ्वीराज कासुर्डे, संजय कासुर्डे उपस्थित होते.