Your Own Digital Platform

दि.27 रोजी फलटणला श्रीराम रथोत्सव


स्थैर्य, फलटण : येथील ग्रामदैवत श्रीराम रथोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे शुक्रवार दि. 22 ते बुधवार दि. 27 नोव्हेंबर दरम्यान पारंपारिक पध्दतीने साजरा होणार असून बुधवार दि. 27 नोव्हेेंबर हा या रथोत्सवातील श्रीराम रथयात्रेचा मुख्य दिवस आहे. या रथोत्सवाची व्यवस्था नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्ट आणि फलटण नगर परिषद यांच्यावतीने पाहिली जाते. 

या सोहळ्यास शुक्रवार दि. 22 नोव्हेंबर रोजी परंपरागत पध्दतीने सुरुवात होणार असून 5 दिवस दररोज रात्री 9 ते 11 या वेळेत मंदिर परिसरात प्रभावळ, अंबारी, शेष, गरुड आणि मारुती ही पाच वाहने परंपरागत पध्दतीने काढण्यात येणार आहेत. या सोहळ्यास दररोज भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. 

मंगळवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत प्रभू श्रीरामाचे रथास 11 ब्राम्हणाद्वारे लघुरुद्राभिषेक होणार असून दुपारी 2 नंतर रथ सजावटीस म्हणजे रथाच्या पोषाखास मानकर्यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे. 

बुधवार दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेत श्रीराम मंदिरात किर्तन झाल्यानंतर सकाळी 8 वाजता प्रभू श्रीरामाची मूर्ती रथामध्ये ठेवण्यात येईल त्यानंतर रथ सोहळा परंपरागत मार्गाने शहरातील मिरवणूकीसाठी मार्गस्थ होईल. सायंकाळी 7 वाजता रथसोहळा मंदिरात परत येईल. त्यानंतर रविवार दि. 1 डिसेंबर रोजी श्रींची पाकाळणी सकाळी काकड आरती व नंतर 11 ब्राम्हणांचा लघुरुद्र व महापुजेने रामरथ यात्रेची सांगता होणार आहे. 

या परंपरागत रथसोहळ्याच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणावर रामरथयात्रा भरते या यात्रेसाठी विविध प्रकारची दुकाने त्यामध्ये मेवामिठाई व महिलांची आभूषणे तसेच लहान मुलांच्या खेळण्यांच्या दुकानांचा समावेश असतो तेथे खरेदीसाठी भाविक गर्दी करतात त्याचप्रमाणे सोहळा शहरातून फिरत असतानाही भाविक दर्शनासाठी या सोहळ्यात सहभागी होतात. यात्रेनिमित्त मोठमोठी खेळण्यांची दुकाने तसेच करमणूकीचे स्टॉल्सही लागतात.

यात्रेच्या निमित्ताने यात्रेच्या दुसर्यादिवशी फलटण नगर परिषद, नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्ट व अन्य संस्थांच्यावतीने जंगी कुस्त्यांचे मैदान भरविण्यात येते त्यामध्ये नामवंत पैलवान हजेरी लावतात. या पैलवानांना इनाम देवून गौरविण्यात येते.