Your Own Digital Platform

नो पार्किंगमध्ये लावलेल्या 30 दुचाकी चालकांवर कारवाई


उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बाहेरील घटना

स्थैर्य, सातारा: येथील सदर बाझारमध्ये असणार्‍या उपप्रादेशिक परिवहन कार्यालया बाहेरील रस्त्यावर नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या 30 दुचाकी दोन क्रेनच्या साह्याने येथील शहर वाहतूक शाखेमध्ये आणण्यात आल्या. दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करून पुन्हा त्या ठिकाणी दुचाकी पार्किंग न करण्याच्या सूचना वाहतूक शाखेच्यावतीने देण्यात आल्या.

याबाबत मिळालेली माहिती अशी, की येथील सदर बाझार परिसरामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. या कार्यालयात आपल्या विविध कामांसाठी जिल्ह्यातून अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात. मुळातच या मार्गावर रस्ता अरुंद आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बाहेर उभारण्यात आलेल्या फुटपाथवर एजंटांनी कब्जा केला आहे त्याच्या विरुद्ध बाजूला अनेक पानटपर्‍या, पीयूसी सेंटर, झेरॉक्स सेंटर असून या दुकानाच्या पुढेच नो पार्किंग मध्ये दुचाकी चालख मोठ्या प्रमाणावर आपली वाहने पार्किंग करत असतात. परिणामी या ठिकाणी रस्त्याचे कोंडी होते. याबाबत तेथील स्थानिक नागरिकांनी शहर वाहतूक शाखेकडे तक्रार केली होती.

आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान शहर वाहतूक शाखेचे पथक दोन क्रेन आणि पोलिसांच्या पीसीआर गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. त्याठिकाणी नो पार्किंग मध्ये लावण्यात आलेल्या 30 दुचाकी दोन क्रेनच्या साह्याने येथील शहर वाहतूक शाखेत आणण्यात आल्या. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पुन्हा नो पार्किंगमध्ये वाहने पार्क न करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या.