Your Own Digital Platform

तब्बल 37 वर्षांनंतर शिवसेना-काँग्रेसचा दोस्तानामुख्यमंत्रिपदाची अभिलाषा आणि त्यास भाजपाने घातलेले खो, या पार्श्‍वभूमीवर राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी अस्तित्वात आली. राज्यातील सत्ता संघर्षात सन 1982 नंतर प्रथमच शिवसेना व काँग्रेेस यांच्यात दोस्ताना पाहावयास मिळत आहे. सन 1982 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘या पुढे काँग्रेसशी कदापि संबंध ठेवणार नाही’ असे वक्तव्य केले होते. ते त्यांनी पाळलेही. परंतु, बदलत्या राजकीय स्थितीत शिवसेना व काँग्रेस पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीत तिला वेळोवेळी संजीवनी देण्याचे काम काँग्रेसनेच केले. याही वेळेस शिवसेनेची मुख्यमंत्रिपदाची मनीषा पूर्ण करण्यासाठी काँग्रेस त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी काँग्रेसनेच पुन्हा एकदा राजकीय पाठबळ दिल्याने शिवसेनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे.

मराठी माणसाच्या हितासाठी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. स्थापनेपासूनच शिवसेना व काँग्रेसचा घरोबा होता. मुंबईचे तत्कालिन सम्राट म्हणून ओळखले जणारे स. का. पाटील आणि शिवसेनेत चांगलीच जवळीक होती. वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्यात आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील दोस्ताना अधिकच वाढला. किंबहुना कम्युनिस्टांच्या वर्चस्वातून मुंबईला मुक्त करण्यासाठी वसंतराव नाईक यांनीच शिवसेनेला आशीर्वाद दिल्याची चर्चा होती. कृष्णा देसाई हत्या व मुंबईत झालेल्या अनेक दंगलीत वसंतराव नाईक यांनी शिवसेनेला पाठिशी घातल्याचा आरोप झाले. शिवसेना व वसंतराव नाईक यांच्यातील घरोब्यामुळेच शिवसेनेवर वसंत सेना अशी टीका आचार्य अत्रे करीत असत.
 
या दरम्यान झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसला अनुकूल भूमिका घेतली. त्याची बक्षिसी त्यांना विधान परिषद सदस्यत्वाच्या रूपाने मिळत गेली. काँग्रेसच्या आग्रहाखातर शिवसेनेने आणीबाणीलाही पाठिंबा दिला. तसेच 1977 मध्ये काँग्रेसचे मुरली देवरा महापौर होण्यात शिवसेनेने महत्त्वाची भूमिका निभावली. आणीबाणीला पाठिंबा दिल्याचा फटका शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीत बसला. परंतु, तरीही तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. अ. र. अंतुले यांच्या मैत्रीखातर शिवसेनेने सन 1980 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे केले नाहीत. एव्हढेच नव्हे तर अंतुले यांच्या प्रचाराची सांगता सभा बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाने झाली.
 
या दरम्यान मुंबईत गिरणी कामगारांचा ऐतिहासिक संप दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. या संपाच्या विरोधात काँग्रेसची भूमिका होती. गिरणी कामगारांमध्ये शिवसेनेला पाठिंबा देणार्‍या कोकणी माणसांचा भरणा होता. त्यामुळे जर काँग्रेसला पाठिंबा दिला तर शिवसेनेचे अस्तित्वच मुंबईतून संपेल असा सूर शिवसेना नेत्यांनी व्यक्त केला. त्यामुळेच सन 1982 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी यापुढे काँग्रेसशी कसलाही संबंध ठेवणार नाही अशी जाहीर घोषणा केली. या भूमिकेशी ते शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसशी कधीही तडजोड केली नाही.
 
रामजन्मभूमी आंदोलन सुरू झाल्यानंतर शिवसेना व भाजपा यांची युती अधिक घट्ट झाली. सन 1995 ला राज्यात व त्यानंतर केंद्रात शिवसेना सत्तेत आली. त्यानंतर शिवसेनेची काँग्रेस विरोधातील धार वाढतच गेली. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधननांतर सन 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत युती तुटली. मात्र, वेगवेगळे लढूनही नंतर शिवसेना व भाजपाने सत्ता स्थापन केली. सन 2019 ची विधानसभा निवडणूक दोन्ही पक्ष एकत्रच लढले. परंतु, अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद द्यावे या मागणीवरून शिवसेनेचे भाजपशी फिसकटले. त्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपद मिळविण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचशी संधान साधत महाविकास आघाडी स्थापन केली. त्यातून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली आहे. ते शिवसेनेचे तिसरे तर ठाकरे घराण्यातील पहिलेच मुख्यमंत्री ठरणार आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या निमीत्ताने सन 1982 नंतर म्हणजेच तब्बल 37 वर्षांनंतर पुन्हा एकदा काँग्रेस व शिवसेनेचा दोस्ताना सुरू झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवे वळण मिळाले आहे. एकप्रकारे शिवसेनेला नवसंजीवनी देण्याचे काम पुन्हा एकदा काँगेसच्याच माध्यमातूनच झाले आहे.
 
वसंतदादांचे विधान...
गिरणी कामगार संपानंतर काँग्रेसपासून फारकत घेत शिवसेनेने स्वंतत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवली. या दरम्यान 1984 मध्ये शिवसेना व भाजपा यांची युती झाली. त्याआधी तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याबाबत संदिग्ध विधान विधान परिषदेत करून शिवसेनेला जागे केले. त्यातून मुंबई महापालिकेवर 1985 मध्ये शिवसेनेची सत्ता आली. सन 1987 मध्ये रिडल्स प्रकरण घडले. त्यानंतर झालेल्या विलेपार्ले पोटनिवडणुकीत ठाकरे यांनी हिंदुत्वाचा उघड-उघड पुरस्कार केला. या निवडणुकीत शिवसेनेचे डॉ. रमेश प्रभू विजयी झाले. या निवडणुकीने राज्यातीलच नव्हे तर देशाच्या राजकारणास वेगळे वळण मिळाले.