Your Own Digital Platform

फलटण स्मशानभूमीनजिक पुलाचे कठडे तुटल्याने अपघातास निमंत्रण


स्थैर्य, फलटण : फलटण-पंढरपूर मार्गावरील फलटणच्या स्मशानभूमीनजिक नजिक असलेल्या पुलाचे तुटलेले कठडे अपघातास निमंत्रण देत असून सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याची तातडीने दखल घेवून तुटलेले कठडे त्वरित दुरुस्त करावेत अशी मागणी होत आहे.
 
शिरवळ - लोणंद - फलटण - बारामती या रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरण कामादरम्यान फलटण स्मशानभूमीलगत असलेल्या या पूलाशेजारी दुसरा पूल बांधून त्यावरुन एकेरी वाहतूकीचा प्रस्ताव होता मात्र सदरचे काम रखडल्याने या संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरण अद्याप पूर्ण झाले नाही परिणामी फलटण शहरालगतच्या या पुलाप्रमाणेच या संपूर्ण मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण रखडल्याने संंपूर्ण रस्त्याची आणि त्यावरील पुलांची दुरावस्था झाली आहे. अगदीच धोकादायक असलेल्या पूलांची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यातून या मार्गापैकी फलटण-बारामती रस्त्याचे मजबुतीकरण डांबरीकरण करण्यात आले मात्र त्यावरील पुलांची दुरुस्ती झाली नसल्यानेच फलटण प्रमाणेच सांगवी येथे नीरानदीवर असलेल्या पुलाची दुरावस्था झाली असून तोही धोकादायक स्थितीत उभा आहे. त्याचप्रमाणे फलटण ते सांगवी दरम्यान असलेले ओढ्यावरील पूलही अरुंद असल्याने तेथेही धोका संभवतो, फलटण शहरालगत सोमवार पेठेत नीरा उजवा कालव्यावर असलेला जुना पुलही अरुंद असल्याने धोकादायक स्थितीत उभा आहे. त्यासाठी या संपूर्ण रस्त्याच्या रुंदीकरण व त्यावरील पुलांची दुरुस्ती तातडीने होण्याची आवश्यकता आहे.
 
फलटण स्मशानभूमीलगत असलेल्या पुलाची लांबी 100 फुटापेक्षा जास्ता आहे. या पुलाच्या उत्तरेकडील बाजूचा कठडा फलटण शहराच्या बाजूने साधारणपणे 10 फूट तुटला आहे. 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी पहाटे आरामगाडी अडकली होती. या मार्गावर वाहनांची खूपच वर्दळ असते. हा पुल बाणगंगा नदीवर असून नदीच्या पात्रापासुन 35 ते 40 फूट उंचीवर आहे तसेच पूल अरुंदही आहे तरी सदर पुलांचे 10-12 फुट तुटलेले कठडे दुरुस्त करावेत किंवा रेलींग बसवावे अशी मागणी होत आहे.