Your Own Digital Platform

बळीराजाच्या नुकसान भरपाईसाठी थेट बांधावर पोहोचणार: रुपाली चाकणकर


 जिल्ह्याजिल्हयात महिला दक्षता समिती सक्रीय करणार

स्थैर्य, सातारा: उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यात धुळे जिल्हयातील बळसाणे गावात तलाठी व्हॉटस अ‍ॅपवर पंचनामे करत असल्याचा प्रकार समोर आला . राज्य शासनाला बळीराजाच्या नुकसानीची वस्तुस्थितीपूर्ण आकडेवारी शासनाला कळावी यासाठी राष्ट्रवादीची महिला आघाडी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर पोहचत आहे . अशी माहिती महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

शहरी व ग्रामीण भागात बीट मार्शल यांच्या सहकार्याने महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला दक्षता समिती प्रत्येक जिल्ह्यात गठीत करणार असल्याचे चाकण कर यांनी स्पष्ट केले . नाशिक धुळे जळगाव या जिल्हयांचा दौरा केल्यानंतर शुक्रवारी रूपाली चाकणकर यांनी सातार्‍याच्या दौर्‍या दरम्यान येथील राष्ट्रवादी भवनात पत्रकारांशी संवाद साधला .
 
चाकणकर म्हणाल्या शेतकर्‍याला प्रतिहेक्टर आठ हजार रुपये भाव जाहीर करून शासनाने शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे . धुळे जिल्हयाच्या सिंदखेडा तालुक्यातील बळसाणे गावात तलाठी व्हॉटस अ‍ॅपवरून पंचनामे करण्याचा प्रकार राष्ट्रवादीने जिल्हा प्रशासनाने फेरपंचनाम्याचे आदेश दिले . शासनाला बळीराजाचे नुकसान किती झाले ? त्याला नुकसान भरपाई मिळाली का ? या प्रश्नांच्या उत्तरांसाठी महिला आघाडी थेट शेतकर्‍याच्या बांधावर पोहचून प्रत्यक्ष माहिती संकलनाचे काम करत आहे . प्रदेश कार्यकारिणीने शेतकर्‍याला प्रतिहेक्टरी पंचवीस हजार रूपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राज्यपालांकडे नोंदवली आहे . शेतकर्‍यांसाठी तलाठी बांधावर पोहचावा ही आमची मागणी आहे .नव्याने अस्तित्वात येणार्‍या सरकारकडून याच निर्णयाची अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले 
 
राज्यात महिलांवर अत्याचार व विनयभंगाचे प्रकार वाढल्याचे स्पष्ट करून रूपालीताई चाकण कर म्हणाल्या जिल्हानिहाय शहर पातळीवर आयुक्तांशी व ग्रामीण भागात पोलीस अधीक्षक यांच्या समन्वयाने महिला दक्षता समित्या बीट मार्शल यांच्यासमवेत सक्रीय करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .पंढरपूर व औरंगाबाद येथील दोन्ही घटनांमध्ये पीडितांना न्याय मिळताना प्रचंड यातायात झाली . तत्कालीन भाजप शासनाच्या काळात आरोपींना पाठिशी घालण्याचे काम झाले असा आरोप चाकण कर यांनी केला.
 
सातारा जिल्हयातील नुकसान भरपाईची माहिती घेऊन त्याचा स्वतंत्र दौरा करण्याचे स्पष्ट करुन चाकणकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना खुबीने उत्तरे दिली .विधान परिषद की महिला आयोग या विषयावर पक्ष जी जवाबदारी देईल ती मनापासून स्वीकारेल . या सगळ्या गोष्टींचा निर्णय पक्ष घेईल असे त्यांनी स्पष्ट केले . निवडणूकीदरम्यान प्रचारात युतीवर टीका केल्यानंतर आता शिव महाआघाडीच्या निर्णयावर काय प्रतिक्रिया आहे ? असे विचारल्यावर रूपालीताई म्हणाल्या राजकारणात जर तर हे सातत्याने सुरू असते .पक्षाचा धोरणात्मक निर्णय असेल त्या पध्दतीने राजकीय वाटचालीची चौकट ठरलेली असेल असेही रुपालीताई चाकणकर यांनी स्पष्ट केले.