Your Own Digital Platform

स्वच्छतेसाठी थेट मंत्रालयातून सरपंचांना पत्र


स्थैर्य, सातारा : स्वच्छता ही चळवळ सातत्याने चालणारी आहे. त्यामध्ये निरंतर अविरत असेच कार्य सुरु राहते. सातारा जिह्यातील बहुतांशी सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंचांच्या नावाने थेट पाणी व स्वच्छता मंत्रालयातून ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय चहांदे यांच्या सहीचे पत्र पोहचले आहे. त्या पत्रातून आपले गाव हागणदारीमुक्त ठेवा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्या पत्राला जिह्यातील 1496 गावांनी प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या मार्गदर्शनानुसार पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडूनही पाठपुरावा सुरु आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते यांनी दिली.

सातारा जिल्हा हा स्वच्छतेत नंबर वन आहे, परंतु स्वच्छता ही निरंतर चालणारी कायमस्वरुपी चालणारी प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये सातत्य हे असायला हवे. याकरता आता शासन पातळीवरुन जे जे काही धोरण ठरतात. निर्णय ठरतात त्याची अंमलबजावणी गाव पातळीवरही करण्यात येते, त्यानुसार राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मंत्रालयातून पत्र पाठवण्यात आलेली आहेत. त्या पत्रानुसार गावात जे काही कुटुंबे अद्यापही बिगर शौचालयाची असतील तर आपण पुढाकार घेवून अशा कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी प्रवृत्त करावे. त्याचप्रमाणे पात्र लाभार्थीची ग्रामसेवकांच्या मदतीने नोंदणी पंचायत समिती कार्यालयात करावी. तसेच केंद्र सरकारच्या संकेत स्थळावरील माहिती प्रणालीमध्ये नोंद करुन घ्यावी. गावामध्ये कोणतेही कुटुंब कसल्याही परिस्थितीमध्ये बिगर शौचालयाचे राहु नये, यासाठी आपण पुढाकार घ्यावा, आपल्या या कृतीमुळे आपले गाव, आपला तालुका आपला जिल्हा आणि आपले राज्य खऱया अर्थाने हागणदारीमुक्त होवू शकणार आहे. तरी आपण या संधीचा पूर्ण फायदा घेवून वंचित कुटुंबांना शौचालय उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन केले आहे. त्यानुसार सरपंचांकडूनही पत्रास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या मार्गदर्शनानुसार जिह्यात स्वच्छतेची चळवळ निरंतर कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.