Your Own Digital Platform

पत्रकारिता देशासाठी एक पवित्र मिशन: उपराष्ट्रपती

स्थैर्य, नवी दिल्ली: राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मार्गदर्शन करताना उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू.

स्थैर्य, नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्यानिमित्ताने माध्यमांना बातम्या रंगवून न सांगण्याची विनंती केली तसेच बातम्यांमध्ये वस्तुनिष्ठता, निष्पक्षपातीपणा आणि अचूकता राखण्याच्या गरजेवर भर दिला. वृत्तविभागाचा निष्पक्षपातीपणा आणि पावित्र्य कायम अबाधित राहायला हवे असे ते म्हणाले. 

राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त आज नवी दिल्लीत प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया द्वारा आयोजित एका कार्यक्रमात ते म्हणाले की पत्रकारांनी द्वारपालांची भूमिका पार न पाडता निष्पक्ष, वस्तुनिष्ठ, अचूक आणि संतुलित माहिती वाचक आणि दर्शकांसमोर सादर करणे हे पत्रकारितेचे मुख्य तत्व आहे. 

उपराष्ट्रपती पुढे म्हणाले की, खोट्या बातम्याचे प्रकरण उघडकीला आल्यानंतर आणि समाज माध्यमांचा मोठा प्रभाव लक्षात घेता सध्याच्या काळात हे अतिशय महत्वाचे आहे. सनसनाटी, पक्षपाती आणि पेड न्यूज आधुनिक काळातील माध्यमांचे दु: ख बनले आहे असे ते म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत तिरकस आणि अभिप्रायपूर्ण वृत्तांकनाला अर्थपूर्ण वृत्तांकन म्हणता येणार नाही असे ते म्हणाले. 

वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्याची स्थापना उद्योजक आणि राजकीय नेते स्वतःचे हित जपण्यासाठी करतात याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. यामुळे पत्रकारितेचा मूळ उद्देश नाहीसा होतो असे ते म्हणाले. स्वातंत्र्य आणि जबाबदारी अविभाज्य मानली जाऊ शकत नाही असे सांगून ते म्हणाले की माध्यमांनी केवळ लोकशाहीचे रक्षण करणारा पहारेकरी म्हणून काम न करता समाजाला भेडसावणार्‍या कुप्रथांविरोधात लढायला हवे. 

गेल्या काही वर्षात माध्यमांमध्ये आमूलाग्र बदल झाला आणि त्याचबरोबर पत्रकारितेच्या मूल्यातही बदल झाला. पूर्वी पत्रकारिता देशसेवेचे मिशन म्हणून पाहिली जात होती असे सांगून ते म्हणाले की पीसीआय सारख्या संस्थांनी गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
 
माध्यमांनी पत्रकारांसाठी आचार संहिता तयार करण्याची वेळ आली आहे असे नायडू म्हणाले. लोकशाहीचे रक्षण आणि समाजाच्या कल्याणासाठी पत्रकारिता महत्वपूर्ण भूमिका पार पाडते त्यामुळे हा चौथा स्तंभ मजबूत करणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले.
 
मोबाइल फोन माहितीच्या आदानप्रदानात क्रांती घडवत आहे. स्मार्ट फोन वापरणारा प्रत्येकजण एक संभाव्य पत्रकार बनला आहे असे ते म्हणले.
 
विकासविषयक बातम्यांना विशेषतः कृषीसारख्या महत्वपूर्ण क्षेत्राला जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्याचे आवाहन उपराष्ट्रपती नायडू यांनी केले.
 
उपराष्ट्रपती म्हणाले कि केवळ कायदे बनवून अपेक्षित परिवर्तन घडवून आणता येणार नाही. भ्रष्टाचार आणि लैंगिक तसेच जातीय भेदभाव सारख्या सामाजिक कुप्रथा दूर करण्याच्या गरजेबाबत जनतेचे एकमत तयार करण्यात माध्यमांनी सकारात्मक भूमिका पार पाडावी असे आवाहन त्यांनी केले. कलम 370 ही केवळ तात्पुरती तरतूद होती जी संसदेने मोठ्या बहुमताने रद्द केली. काश्मीरबाबत तथ्य जगासमोर आणण्याचे आवाहन त्यांनी भारतीय पत्रकार समुदायाला केले.

यावेळी राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्त उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी ’पत्रकारितेतील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार 2019’ प्रदान केले. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील पत्रकारांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरवण्यात आले. उपराष्ट्रपतींनी पुरस्कार वितरण समारंभात पत्रकारिता आचार निकष -2019, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची डिरेक्टरी आणि स्मरणिका प्रकशित केली.