Your Own Digital Platform

झिरपवाडी केंद्राची शिक्षण परिषद संपन्न


स्थैर्य, फलटण : झिरपवाडी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद येथील स्व.शिलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्यामंदिर, कोळकी येथे नुकतीच पार पडली. या शिक्षण परिषदेचे उद्घाटन केंद्रप्रमुख निकाळजे यांच्या हस्ते झाले. यानंतर केंद्रातील असणार्‍या सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा यांच्या मुख्याध्यापकांचे स्वागत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रज्ञा काकडे यांच्या हस्ते करण्यात आलो. सत्कार समारंभानंतर परिपाठा दरम्यान प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.काकडे यांनी बालोद्यान - कृतीगीत सादर केले. यानंतर मार्गील शिक्षण परिषदेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. अध्ययन स्तर टप्पा क्र.1 चे विश्लेषण त्याचबरोबर डीएएस-1 चे विश्लेषण करण्यात आले. यानंतर शिक्षण हृदय या विषयावर शिवम प्रतिष्ठानच्या साधक सुषमा काटे यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये शिक्षकाचे वर्तन भूमिका या विषयी मार्गदर्शन केले. यानंतर व्यक्तिमत्व विकास या विषयावर ब्रिलीयंट अ‍ॅकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूलचे शिक्षक दत्तात्रय पतंगे यांनी व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व कसे बनते, त्याचा विकास कसा होतो, व्यक्तिमत्वावर प्रभाव पाडणारे घटक, व्यक्तिमत्त्वाचे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक पैलुंवर वक्तव्य केले. त्याचबरोबर शाळेमध्ये शिक्षकाचे व्यक्तिमत्व कसे असावे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकाची भूमिका कशी असावी, सकारात्मक दृष्टीकोन, आशावादी असणं किती महत्त्वाचे असते, विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्व विकासावर शिक्षकांनी कोणते उपक्रम, स्पर्धा घ्याव्यात, शाळेतील वर्तन कसे असावे या विषयी मार्गदर्शन केले. 

शिक्षण परिषदेची सांगता पसायदानाने झाली. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षीका सौ.प्रतिभा साळुंखे यांनी केले. शिक्षण परिषद यशस्वी करण्यात प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रज्ञा काकडे, सौ.रुपाली रसाळ, प्रतिभा साळुंखे, सौ.गायकवाड, सौ.दणाणे, सौ.राणी पतंगे, सौ.चांगण, सौ.अहिवळे आदी शिक्षक वर्गांनी मोलाचे परिश्रम घेतले. या परिषदेतील शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन शिक्षकांना नाविन्य व प्रेरणादायी होते. कार्यक्रमाचे आभार सौ.गायकवाड यांनी मानले.