‘फास्टॅग’ अंमलबजावणीची जय्यत तयारी


इंधन, वेळ, पैसा वाचवून प्रदूषण रोखण्यासाठी 1 डिसेंबरपासून महामार्गावरील सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतच्या सूचना टोलनाक्यांच्या एजन्सीना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाक्यांवर सध्या फास्टॅगसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
 
फास्टॅगची सुविधा निर्माण करून देण्यासाठी नाक्यावर विविध बँकांनी आपली केंद्रे सुरू केली आहेत; मात्र सध्या एकच लेन रोख रक्‍कम भरणार्‍या वाहनांसाठी ठेवण्यात आल्याने बहुतांश वाहनधारकांकडे फास टॅगची स्टीकर नाहीत, तसेच त्यांच्यामध्ये फारसे प्रबोधन झाले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात फास्टॅग सुरू होईल, त्यावेळी नाक्यावरील एकाच लेनवर रोख पैसे भरण्यासाठी वाहनांची गर्दी निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बहुतांश सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग सुरू होणार आहे. ये-जा करणार्‍या लाखो वाहनांची चांगली सोय होणार आहे. या वाहनांचे इंधन, वेळ, पैसा बचत होणार आहे आणि प्रदूषणदेखील घटणार आहे. यासाठी रोख रक्‍कम देऊन टोल भरण्याऐवजी फास्टॅग प्रणालीद्वारे टोल भरणा केला जाणार आहे; मात्र एकच लेन रोखीने पैसे घेण्यासाठी ठेवण्यात येणार असल्याने नाक्यांवर वाहनांच्या रांगाच रांगा लागण्याची शक्यतादेखील व्यक्‍त केली जात असून ही मुदत नंतर वाढविण्यात येईल, असे मतदेखील टोल नाक्यावरील कर्मचारी, अधिकारी यांच्याकडून व्यक्‍त केले जात आहे.

महाराष्ट्र - कर्नाटक राज्याच्या सीमेवर कोगनोळी येथील टोल नाक्यावर सध्या बारा लेन आहेत. त्यातील जाणारी एक आणि येणारी एक अशा एकाच लेनवर रोखीने पैसे भरण्याची सुविधा निर्माण करण्यात आली. उर्वरित सर्व लेन फास्टॅगसाठी निश्‍चित करण्यात आल्या आहेत. या नाक्यावर फास्टॅगच्या स्टिकरसाठी ‘आयसीआयसीआय’ बँकेने केंद्र देखील सुरू केले आहे. या नाक्यावरून जाणारी रोजची वाहने अंदाजे 15 ते 16 हजार दरम्यान आहेत. सोमवार आणि मंगळवारी वाहनांची संख्या जरा कमी असते. 25 ते 26 विविध प्रकारच्या सरकारी वाहनांना सवलती आहेत. दरम्यान, फास्टॅग सुविधा घेणारे सध्या 30 ते 35 टक्केच वाहनधारक आहेत. इतर वाहनांनीही सेवा घेतली नाही. त्यामुळे टोल नाक्यावरील एक लेन वगळता सर्व लेन फास्टॅगसाठी ठेवण्यात आल्यामुळे एका लेनवरून पैसे भरून पुढे जाणार्‍या वाहनांची मोठी गर्दी होणार आहे. वाहनांच्या रांगा लागण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे.

No comments

Powered by Blogger.