Your Own Digital Platform

ग्रामीण उद्योजक स्त्रीयांचा सातार्‍यात महोत्सव


माणदेशी फौंडेशनचे जिल्हा परिषद मैदानावर 21 ते 24 प्रदर्शन

स्थैर्य, सातारा: सातार्‍यात दि 21 ते 24 नोव्हेंबर रोजी येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर ग्रामीण भागातील स्त्री उदयोजकांना उत्तेजन देणारा माणदेशी महोत्सव सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत आयोजित करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यंदाच्या महोत्सवात 180 हून अधिक महिला उद्योजक या महोत्सवात सहभागी होत असून दोन लाखापर्यंतच्या अद्ययावत मशिनरी पहायला मिळणार आहेत . या प्रदर्शनात उदयोजक महिला आपले शेती व बारा बलुतेदारीचे कौशल्य सादर करतात . यंदा महोत्सवाला सेल्को फौंडेशन बंगलोर, ब्ल्यू स्टार ऑटोमोबाइल इचलकरंजी, सीएसी ई - गव्हर्नन्स शिरूर, म्हसवडकर ट्रेडिंग कंपनी यांचे सहकार्य लाभले आहे. 

घोंगडी , चादर, लेदरच्या वस्तू, बदाम शेंगदाणा सूर्यफूल तेलं, केमिकल विरहित डाळी, पिके, धान्य उत्पादने, बांबूच्या लाकडाच्या आकर्षक वस्तू, ग्रामीण भागातील झुणका भाकरी, थालपीठे, मासवडी, मांडे दालबाटी रुचकर पकवान्ने यांच्यासह जात्यावरची डाळं भरडण्याचा व ताक बनविण्याचा अनुभव सातारकरांना माणदेशी महोत्सवाच्या निमित्ताने घेता येणार आहे.

महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी दि 21 रोजी सायं 5 वाजता जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते होणार आहे . जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा उदयोग केंद्राचे महाव्यवस्थापक संजय रोकडे यांची सन्माननीय उपस्थिती आहे . शुकवार दि 22 रोजी महिलांसाठी सकाळी11 ते 4 या दरम्यान मार्गदर्शन व आरोग्य तपासणी शिबिर व सायंकाळी पाच वाजता भारूड सम्राज्ञी चंदा तिवारी यांचे भारूड होणार आहे . दि 23 रोजी सायंकाळी पाच वाजता माणदेशी उदयोजिका पुरस्कार सोहळा व अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या हस्ते पन्नास मुलींना सायकलवाटप करण्यात येणार आहे . रविवार दि 24 रोजी सायं 5 वाजता माणदेशी चॅम्पियन कडून मुलींची कुस्ती व झी मराठी फेम दुर्गेश नंदिनी प्रस्तुत गजर महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे .जेन, घोंगडी, ज्वारी , बाजरी, कडधान्ये, व इतर वस्तूसाठी महोत्सवातील 180 स्टॉलवर सातारकरांनी भरभरून खरेदी करावी असे आवाहन चेतना सिन्हा यांनी केले आहे .