Your Own Digital Platform

कराड शहरात नेटीझन्सची गांधीगिरी

स्थैर्य, कराड : वाहनचालकांना प्रशस्तीपत्र आणि गुलाबपुष्प देताना नेटीझन्स. 

स्थैर्य, कराड : कराडमध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करणार्‍या कराड नगरपालिकेचा निषेध नोंदवण्यासाठी, कराडमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या समस्यांना वाचा फोडणार्‍या नागरिकांनी गांधीगिरी करत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. नागरिकांनी चालकांसह प्रवाशांना प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देऊन खराब रस्त्याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. 

कराड - तासगाव आणि कराड - विटा या दोन प्रमुख मार्गाना जोडणारा कराड शहरातील विजय दिवस चौक ते भेदा चौक या मार्गाची दुरवस्था झाली आहे. गेली सहा ते सात महिने खड्ड्यातून मार्ग काढावा लागत आहे. यामुळे छोटे - मोठे अपघात नित्याचीच गोष्ट बनली आहे.
 
दररोज कराड शहर आणि जिल्ह्यासह परजिल्ह्यातील लाखो लोक या मार्गावरून प्रवास करतात. मात्र खराब रस्त्यांमुळे वाहनधारकांसह पादचार्‍यांना जीव मुठीत घेउन प्रवास करावा लागत आहे. रस्ता दुरूस्त करण्याच्या मागणी विषयी वांरवार मागणी करूनही कराड नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याने दक्ष कराडकर या सोशल मीडियावर कार्यरत असणार्या ग्रुपकडून वाहन चालकांना खड्डेयुक्त रस्त्यावरून प्रवास करत आपला व अन्य चालक, प्रवाशी यांचा जीव वाचवल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन रस्त्यावरचं सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी गुलाब पुष्प भेट देत गांधीगिरीची निती वापरत अनोखे आंदोलन करण्यात आले. 

यावेळी कराड नगरपालिका प्रशासनाचा नागरिकांनी जोरदार निषेध नोंदवला. विशेष म्हणजे या रस्त्याचे टेंडर मंजूर असूनही काम होत नाही. प्रशासनाला लोकांचे बळी जाण्याची प्रतिक्षा आहे का? असा प्रश्न उपस्थित करत नगरपालिकेतील विरोधी गटनेते नगरसेवक सौरभ पाटील यांच्यासह दक्ष कराडकर या ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी नगरपालिका प्रशासनाने जनभावनेची कदर करावी, असे आवाहन केले आहे.