Your Own Digital Platform

श्रीराम कारखान्यास जास्तीत जास्त ऊस घालावा: श्रीमंत संजीवराजे

स्थैर्य, फलटण : श्रीराम - जवांहर सहकारी साखर उद्योगाच्या गळीत हंगाम शुभारंभाप्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व मान्यवर.

श्रीराम जवाहर सहकारी साखर उद्योग या संस्थेच्या 14 व्या आणि श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या 63 व्या गळीत हंगाम शुभारंभस्थैर्य, फलटण : संस्था आपली आहे, तीचे सभासद आपले आहेत या भावनेने श्रीमंत शिवाजीराजे, श्रीमंत दादाराजे आणि त्यांचे तत्कालीन सहकारी वागले म्हणूनच सहकारी संस्था वाढल्या सत्ता बदलानंतर मात्र या संस्था राजकारणाचा अड्डा बनल्या, संस्था चालविणारे या संस्थांचे मालक असल्यासारखे वागू लागल्याने सभासदांमध्ये या संस्था आपल्या नसल्याची भावना वाढीस लागली परिणामी संस्था डबघाईला आल्याचे सांगून, ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी श्रीराम कारखाना आपला असल्याच्या भावनेतून जास्तीत जास्त ऊस घालावा, असे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

श्रीराम सहकारी साखर कारखाना चालविणार्या श्रीराम जवाहर सहकारी साखर उद्योग, फलटण या संस्थेच्या 14 व्या आणि श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या 63 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी श्रीमंत संजीवराजे बोलत होते, अध्यक्षस्थानी माजी संचालक दत्ताजीराव सूर्यवंशी (बेडके) होते. जवाहर साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन विलासराव गाताडे, संचालक बाबासाहेब चौगुले, आदगोंडा पाटील, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, सभापती सौ. प्रतिभाताई धुमाळ, बाजार समितीचे व्हा. चेअरमन भगवानराव होळकर, दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार, व्हा. चेअरमन महादेव चव्हाण, वसंतराव गायकवाड, संभाजीराव निंबाळकर, मोहनराव नाईक निंबाळकर, अ‍ॅड. राजेंद्र भोईटे, सुरेश फडतरे, उमाकांत कदम, मारुती रामचंद्र सांगळे (पाटकरी), व्हा. चेअरमन नितीन भोसले व संचालक, कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर, प्रोजेक्ट मॅनेजर मानसिंग पाटील, सभासद व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

श्रीराम लवकरच पूर्व वैभवाप्रत पोहोचणार

माजी खासदार कल्लाप्पा आण्णा आवाडे, आ. प्रकाश आवाडे, खा. शरदराव पवार, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 13 वर्षात कारखाना पुन्हा पूर्वीच्या पद्धतीने सभासद/ऊस उत्पादक शेतकर्यांना विश्वासात घेऊन चालविण्यात विश्वासाचे नाते निर्माण झाल्याने आता श्रीरामला पूर्ववैभवापर्यंत नेण्यात फार वेळ लागणार नसल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले. श्रीराम कारखाना सभासदांची मालकी मानतो म्हणून येथे सभासद शेतकर्‍यांना आपले मत मांडता येते, या उलट खाजगी कारख्यान्यात कोणालाही आपले मत मांडण्याचा प्रयत्नही करता येत नसल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी स्पष्ट केले.

नीरा खोर्‍यातील अन्य कारखान्याइतका दर

उसाला अधिक दर, वेळेवर ऊसाची तोड आणि ऊसाचे योग्य वजन ह्या ऊस उत्पादकांच्या माफक अपेक्षा असून त्यापैकी वेळेवर तोड आणि योग्य वजन यात कसलीच अडचण नाही किंबहुना गेल्या 13 वर्षात ह्या बाबी सांभाळण्यात आल्या मात्र ऊसाला अधिक दर देताना नीरा खोर्यातील अन्य कारखान्यांच्या तुलनेत कमी दर मिळणार नाही याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे यांनी दिली.

संपूर्ण ऊस श्रीरामला देण्यातच शेतकर्‍यांचे हित

अधिक गाळप झाल्याशिवाय अधिक दराचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही, त्यासाठी शेतकर्यांनी आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी श्रीरामलाच दिला पाहिजे यावर्षी प्रतिदिन 3100 मे. टन गाळप क्षमता असली तरी ती 5 हजार मे. टनापर्यंत वाढविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगून ऊस दराबाबत एफ.आर.पी. यावर्षी पूर्ण दिली आहे, त्याप्रमाणे यावर्षीही एफआरपी देण्यात अडचण येणार नाही किंबहुना त्यापेक्षा अधिक द्यावे लागले तर त्याचाही विचार होण्याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे यांनी दिली.

गाळप क्षमता वाढ, आणि उत्पादन खर्चात काटकसर

आवाडे दादा, श्रीमंत रामराजे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातील वेगळी संकल्पना यशस्वी करुन श्रीराम उत्तम प्रकारे चालविला असून योग्य वजन, ऊसाचे पेमेंट व कामगार देणी वेळेवर देऊन ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केला आहे, गाळप क्षमता वाढविण्याबरोबर, कमी खर्चात अधिक गाळप करण्याच्या प्रयत्नातून उसाला अधिक दराची संकल्पना यशस्वी करणे शक्य झाल्याचे जवाहर साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन विलासराव गाताडे यांनी सांगितले.

डॉ. शेंडे यांचे सविस्तर विवेचन

प्रारंभी श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर प्रास्ताविकात अतिवृष्टीने तुटणार्या ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे, त्याचप्रमाणे नवीन ऊस लागणी आणि अन्य उभ्या ऊसाचे नुकसान झाले असले तरी यावर्षी 4 लाख मे. टनाहुन अधिक गाळप करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे डॉ. शेंडे यांनी स्पष्ट केले. गाळप सुरु झाल्यानंतर कोणत्याही अडथळ्याशिवाय अखंडित गाळप सुरु रहावे यासाठी मशिनरी उत्तम प्रकारे तयार करण्यात आली आहे, राजकारण विरहित केवळ उद्योग म्हणून साखर कारखाने चालविले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करतानाच ऊसासाठी ठिबक सिंचन, पट्टा पद्धतीची लागण, विद्यापीठांनी सुचविलेल्या नवीन ऊसाच्या जाती स्वीकारणे तसेच बेणे बदलणे याला पाठींबा दिला पाहिजे, आगामी काळात तोडणी वाहतूक मशिनरीद्वारे करावी लागणार असल्याने त्या पद्धतीने ऊसाच्या लागणी करण्याचे आवाहन यावेळी डॉ. शेंडे यांनी केले आहे.

यावर्षीच्या गळीत हंगामाचा शुभारंभ ऊस उत्पादक शेतकर्यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्याच्या संकल्पनेनुसार यावर्षी तुकाराम सिताराम खटके, खटकेवस्ती, नारायण गुलाबराव साळुंखे, होळ, जगन्नाथ लक्ष्मन माने, सांगवी, अशोक जगन्नाथ जाधव, चौधरवाडी, यशवंतराव माधवराव सुर्यवंशी, शेरेचीवाडी (हिंगणगाव), सुर्याजी संभाजी माने हनुमंतवाडी, विश्वास विठोबा माळवे, राजुरी यांच्या हस्ते गव्हाणपूजन व गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगाम शुभारंभ करण्यात आला.
 
संचालक कांतीलाल बेलदार पाटील यांनी समारोप व आभार प्रदर्शन तर संचालक संतोष खटके यांनी सूत्र संचलन केले.