Your Own Digital Platform

जबरी चोरी प्रकरणी सालपेतील आरोपीस अटक


लोणंद पोलीसांची धडक कारवाई

स्थैर्य, फलटण : जबरी चोरी प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्याकडून आरोपींस शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, काल रात्री एकच्या सुमारास गजानन मनमतआप्पा हलगे सध्या रा. शरयू साखर कारखाना कॉलनी, मोटेवाडी, कापशी ,ता. फलटण हे त्यांच्या मुलासह कारखान्याकडे जात असताना जय तुळजाभवानी ढाब्याजवळ त्यांची गाडी अचानक बंद पडली. बॅटरी उजेडात गाडी ढकलत असताना निर्जन ठिकाणी पाठीमागून एका पल्सर गाडीवर तिन आणि डिस्कवर गाडीवर दोन अनोळखी इसम आले . त्यांनी हलगे यांना मारहाण केली. तसेच मुलगा शिवम यांच्या गळ्याला सुरा लावून त्यांच्या खिशातील मोबाईल ,एक हजार रुपये रोख असा एकवीस हजार रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने घेऊन मोटारसायकलवर निघून गेले. याबाबत लोणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
 
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि चौधरी यांनी ठाणे हद्दीत सर्वत्र नाकाबंदी करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता कापडगाव फाटा परिसरात एक डिस्कवर दुचाकीवर तीन संशयित पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले . नाकाबंदी वरील कर्मचारी यांनी त्यांचा पाठलाग करून सौरभ संजय जगताप व 21 रा. सालपे, ता. फलटण याला पकडून ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ गुन्ह्यांमध्ये वापरलेला सुरा व रोख रक्कम 1000 मिळून आले. गुन्ह्यात वापरलेली बिगर नंबर प्लेटची डिस्कवर दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीकडून अधिक विचारपूस करून इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन टीम रवाना करण्यात आल्या आहेत.सापडलेल्या आरोपीस अटक करण्यात आली आहे.

गुन्ह्यात मिळालेली बिगर नंबर प्लेटची डिस्कवर दुचाकीची चौकशी केली असता सदर गाडी चोरीची असल्याचे समोर आले आहे. 25 नोव्हेंबर 19 रोजी जेजुरी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. लोणंद पोलीस ठाण्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कामगिरी केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी ,पोलीस उपनिरीक्षक माने, सहाय्यक पोलीस फौजदार महामुलकर, वाघमारे, पोलीस हवलदार सपकाळ ,शिवरकर, पवार, गायकवाड, नाळे ,शेख, शिंदे, सावंत वाहन चालक शिंदे , होमगार्ड भोईटे आदींनी तपासात सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने करीत आहेत.