Your Own Digital Platform

दारुच्या नशेत माजी नगरसेवकाकडून हवेत गोळीबार
गोळीबारानंतर स्वत:ला घेतले कोंडून; सदरबझार परिसरात घबराहट

स्थैर्य, सातारा: येथील सदरबझार परिसरात वास्तव्यास असलेले माजी नगरसेवक महेश जगताप यांनी दारुच्या नशेत विक्रम रसाळ यांना मारहाण करत हवेत गोळीबार केला. गोळीबारानंतर बंगल्यातील खोलीत कोंडून घेतलेल्या महेश जगताप यांना सातारा पोलीसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेने काही काळ परिसरात घबराहटीचे वातावरण तयार झाले होते. 

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, सदरबझार मधील अक्षय ब्लड बँकेजवळील कॉलनीत असणार्‍या प्रनाम नावाच्या बंगल्यात माजी नगरसेवक महेश जगताप हे राहण्यास आहेत. त्यांच्या घरासमोर एक इमारत असून तीच्या पहिल्या मजल्यावर डॉ. दिपांजली पवार यांचे मधुमेह क्लिनिक आहे. त्याच इमारतीतवरील मजल्यावर विक्रम चंद्रकांत रसाळ यांचे विक्रम कॉम्प्युटर टायपिंग इन्सिटट्यूट आहे. या इन्सिटट्यूटचा फलक त्यांनी इमारतीच्या दर्शनी भागात लावला आहे.याचठिकाणी डॉ.पवार यांनी सुध्दा आपल्या दवाखान्याचा फलक आहे. फलक तसेच दवाखान्यासमोर वाहने लावण्याच्या कारणावरुन रसाळ आणि डॉ.पवार यांच्यात वाद आहेत. या वादातून तोडगा काढण्याचे प्रयत्न त्याच इमारतीत राहणार्‍या काही रहिवाशी आणि बिल्डरने गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु आहे.

गुरुवारी सायंकाळी घडलेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत चंद्रकांत रसाळ आणि विक्रम यांच्या भावाने दिलेली माहिती अशी, गुरुवारी सायंकाळी विक्रम रसाळ हे क्लासमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत होते. यादरम्यान दारुच्या नशेत महेश जगताप हे एका साथीदारासमवेत त्याठिकाणी आले. त्यांनी क्लासमध्ये असणार्‍या विक्रम रसाळ यांना बाहेर घेत मारहाण केली. मारहाण करतानाच त्यांनी सोबत असणार्‍या दोन पिस्तुलांचा धाक विक्रम यांना दाखवला. यानंतर मारहाण करतच जगताप यांनी विक्रम यांना इमारतीच्या खाली आणले. यानंतर जगताप यांनी रसाळ यांना डॉ. दिपांजली पवार यांच्या दवाखान्यात नेले. याठिकाणी जगताप यांनी दमदाटी करत रसाळ यांना डॉ. पवार यांची माफी मागण्यास सांगितले. रसाळ यांनी त्यानुसार माफी मागितली. यानंतर ते सर्वजण डॉ. पवार यांच्या दवाखान्यातून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर जगताप यांनी पिस्तुल हातात घेत त्यातून एक गोळी हवेत झाडली. गोळी झाडल्यानंतर पुन्हा काही गडबड केलीस तर तुला गायब करीन, अशी धमकी विक्रम रसाळ यांना देत बंगला गाठल्याची माहितीही चंद्रकांत रसाळ यांनी दिली. गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरात घबराट पसरली. यानंतर विक्रम रसाळ यांनी याची माहिती वडील चंद्रकांत व भावास दिली. त्यांनी सदर माहिती सातारा शहर पोलीस ठाण्यास दिली. माहिती मिळताच सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक बाजीराव ढेकळे हे कर्मचार्‍यांसमवेत त्याठिकाणी दाखल झाले. यानंतर त्याठिकाणी शाहूपुरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील हे सुध्दा दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत विक्रम रसाळ यांच्याकडून घटनेची संपुर्ण माहिती घेतली. 

माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहाय्यक अधीक्षक समीर शेख हे घटनास्थळी दाखल झाले. जगताप यांनी बंगल्यात असणार्‍या एका खोलीत स्वत:ला कोंडून घेतले होते. पोलिसांनी सदर खोलीतून जगताप यांना बाहेर काढत त्यांच्याकडे घटनेच्या अनुषंगाने चौकशी केली. या घटनेच्या अनुषंगाने तक्रार देण्यासाठी विक्रम रसाळ हे रात्री सातारा शहर पोलीस ठाण्यात गेले होते.

पोलीस प्रमुखांनी दिली घटनास्थळी भेट
दरम्यान, घटनास्थळाची पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहाय्यक अधीक्षक समीर शेख यांनी करत तपासाच्या सुचना अधिकारी, कर्मचार्‍यांना दिल्या. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाची तपासणी तसेच जगताप यांची चौकशी करण्याचे काम शहर पोलिसांकडून सुरु होते.