Your Own Digital Platform

खेळाडूंना राज्यासह देशाचे नाव उज्वल करण्याची संधी : जिल्हाधिकारी श्वेता सिंघल

स्थैर्य, सातारा : राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटनाप्रसंगी दीपप्रज्वलन करताना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल.

65 व्या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन

स्थैर्य, सातारा : राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धक तयार होत असून राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी कशाचीही तमा न बाळगता जिद्दीने खेळावे विजय तुमचाच आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केले.

येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आज 65 व्या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी क्रीडा ध्वज फडकावून उद्घाटन केले, यावेळी सर्व खेळाडूंनी उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, क्रीडा उपसंचालक चंद्रकांत साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

चार दिवस चालणार्‍या या क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा विभागाने चांगले नियोजन केले आहे. या स्पर्धा चांगल्या वातावरणात पार पडतील. या स्पर्धेत उत्साहाने खेळा मनापासून जिंकण्याचा प्रयत्न करा, असे सांगून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा सातार्‍यात होत आहे, ही आपल्या सर्वांच्या अभिनाची गोष्ट असे सांगून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते पुढे म्हणाल्या, आपल्या देशातील बर्‍याच खेळाडूंनी अनेक अडचणींवर मात करुन राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल केले आहे, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठवून स्पर्धकांनी आपली भावी वाटचाल करावी. राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल करण्याची क्षमता स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनमध्ये आहे. प्रयत्न करत रहा एकना एक दिवस यश नक्की प्राप्त होईल, असा विश्वासही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शेवटी व्यक्त केला.

राज्यस्तर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, क्रीडा पीठ या नऊ विभागातील 2 हजार 106 खेळाडू, संघव्यवस्थापकांचा सहभाग आहे. या क्रीडा स्पर्धेमधून पंजाब येथे होणार्‍या 65 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याचा प्रातिनिधीक संघ निवडला जाणार आहे.