Your Own Digital Platform

तीन लाखाचा रस्ता गेला वाहून


स्थैर्य, सातारा : निवडणुकीपूर्वी पावसाळयाच्या तोंडावर रस्ता करुन देण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाच्यावतीने दिले गेले. ठेकेदार तुकाराम सुतार यांनी खडी आणून टाकली. हलक्या दर्जाचे डांबराचे पाणी टाकले. कसाबसा केलेला रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला. तेव्हापासून आजपर्यंत प्रभाग 20 मधील बालाजी अपार्टमेंटपाठीमागील नागरिक खाचखळग्याच्या रस्त्यावरुनच ठेचा खात जात आहेत. तब्बल चार महिने या भागात होत असलेली दुर्दशा पाहण्यासाठी स्थानिक नगरसेवक हेही फिरकले नाहीत. त्यामुळे आता केव्हा रस्ता होणार असा सवाल नागरिकांनी केला आहे.

प्रभाग 20 मध्ये समर्थ मंदिरपासून हाकेच्या अंतरावर बोगदा रस्त्याला बालाजी अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटच्या पाठीमागे सुमारे अडीचशे ते तीनशे लोक राहतात. त्या नागरिकांना जाण्या-येण्याकरता रस्ता आहे. तो रस्ता अतिशय उताराचा आहे. त्या रस्त्यावरुन येजा करतात. येथील नागरिकांना सातत्याने हा रस्ता करुन द्यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार निवडणुकीपूर्वी पावसाळयाच्या तोंडावर या रस्त्याचे कामास सुरुवात झाली होती. नागरिकांनीही बरे वाटले रस्ता होणार आपली वाहने सुरक्षित वरपर्यंत जाणार, रात्रीच्या व दिवसाच्या ठेचा खाव्या लागणार नाहीत.
 
वयोवृद्धांना पडलेल्या खड्डयातून वाट काढावी लागणार नाही. परंतु पालिकेने ठेकेदार तुकाराम सुतार यांनाच काम मिळाले अन् त्यांनी चुकीच्या पद्धतीने काम करत इतर कामांप्रमाणेच ‘पाचर’ मारले. बोगद्यानजिक असलेल्या एका ओढयावरच्या पुलाचे कामही ओबडधोबड केले आहे. त्याने काम हाती घेतल्यानंतर अगोदर रस्त्याखाली असलेल्या पाईपलाईनची व्यवस्था करायला हवी होती. परंतु ती न करता थेट असलेल्या रस्त्यावर मोठी खडी अंथरली. ती खडीही रोलरने दाब देवून चांगली बसवायला पाहिजे होती. तशी बसवली गेली नाही. त्यावर डांबराचे प्रमाण कमी वापर करुन कसा बसा रस्ता तयार केला. पहिल्याच पावसाचे पाणी जोराचे आले. त्यामध्ये हा तयार केलेला रस्ता वाहून गेला.
 
आता येथील नागरिकांना आपली वाहने वर नेताना अगदीच जोखीम स्वीकारावी लागते. शिवाय पालिकेचा पैसाही वाया गेला आहे.